आंतरराज्यीय टोळीला क्लोन धनादेशाचा पुरवठा करणाऱ्या मास्टर माइंड अशोककुमार भन्साळीला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 03:58 PM2018-11-29T15:58:18+5:302018-11-29T15:59:45+5:30
कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या मास्टर माइंडला ठाण्यात बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा पोलिसांना मंगळवारी यश आले.
औरंगाबाद : बड्या खातेदारांच्या धनादेशाचे क्लोन करून त्याआधारे देशभरातील अनेकांना आणि बँकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीच्या मास्टर माइंडला ठाण्यात बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा पोलिसांना मंगळवारी यश आले. बोरीवलीमध्ये चारचाकी वाहनांचे सुटे भाग विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या या पांढरपेशा आरोपीला पकडल्यानंतर,‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत, त्याने दिशाभूल करण्याचा केलेला प्रयत्न चाणाक्ष पोलिसांनी हाणून पाडला.
अशोककुमार लहेरचंद भन्साळी (४९, रा. बोरीवली पूर्व, जि. ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तपासाअंती या आंतरराज्यीय टोळीला क्लोन धनादेशाचा पुरवठा करणारा अशोककुमार भन्साळी असल्याचे निष्पन्न झाले होते. तो मुंबईत चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट विक्र ीचे दुकान चालवितो. तो मास्टर माइंड असून, तो के वळ रशीद खान याच्याच संपर्कात होता. अन्य आरोपी त्याला ओळखत नव्हते. एवढेच नव्हे तर रशीदलासुद्धा तो केवळ हॉटेलमध्येच भेटत असे. त्याच्या घराचा पत्ता त्याने कोणालाही दिला नव्हता.
पोलिसांनी रशीद आणि अन्य आरोपींना अटक केल्यापासून अशोक कुमार अटकेच्या भीतीने पसार झाला होता. तो बोरीवलीत असल्याची माहिती खबऱ्याक डून मिळाली आणि पो.नि. मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी नितीन मोरे, मनोज चव्हाण, हकीम शेख, भगवान शिलोटे, ज्ञानेश्वर पवार, संतोष सूर्यवंशी, संजय खोसरे आणि चंद्रकांत सानप यांनी आरोपीला पकडून औरंगाबादेत आणले.
बनावट कागदपत्रांआधारे बँक खाते उघडून कॉर्पोरेट खातेदारांच्या बँक खात्यातून क्लोन धनादेशाद्वारे लाखो रुपये पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने २६ जूनला पर्दाफाश केला होता. या टोळीतील सात जणांना विविध ठिकाणांहून अटक करून त्यांच्याकडून पावणेदोन लाखांच्या रोकडसह संगणक, प्रिंटर, २७ एटीएम कार्ड, १५ मोबाईल, २६ बँकांच्या धनादेश पुस्तिका, ९ रबरी शिक्के, निवडणूक कार्ड, पॅनकार्ड, नोटा मोजण्याचे यंत्र आणि एक कार, असा सुमारे दहा लाखांचा ऐवज जप्त आहे.
अटक केलेल्यामध्ये हरीश गोविंद गुंजाळ (३९, रा. माणगाव, नमसवाडी, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), मनीषकुमार जयराम मौर्या ऊर्फ राकेश ऊर्फ मनीष रामलाल यादव ऊर्फ अमित रमेशसिंग (२३, रा.सिखडी, जि.भदोनी, उत्तर प्रदेश), मनदीपसिंग बनारसीदाससिंग (२९, रा. दिनानगर, जि.गुरुदासपूर, पंजाब), रशीद इम्तियाज खान (२०, रा. आसेवालनगर, नालासोपारा, ता. वसई, जि.पालघर) आणि डब्ल्यू शेख अरमान शेख (३२, रा. कमलसागर, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) यांचा समावेश होता.
अशोक शेठ म्हणून बोरीवली पूर्वमध्ये वावरणारा पांढरपेशा आरोपी केवळ रशीद खान याच्याच संपर्कात होता. रशीदने अन्य साथीदार तयार केले. रशीदला कोण धनादेश देतो, हे अन्य आरोपींना माहिती नव्हते. शिवाय रशीदही अशोकला हॉटेलमध्येच भेटत असे. यामुळे तो कोठे राहातो, हे कोणालाही माहीत नव्हते. शिवाय अशोकने रशीदला बोलण्यासाठी एक स्वतंत्र सीमकार्ड घेतले होते. त्याच सीमकार्डच्या नंबरवरून तो रशीदला बोलत असे. बोलणे झाले की, फोन बंद करी. रशीदच्या मोबाईलवर याच नंबरवरून कॉल आल्याचे तपासात समोर आले आणि अशोककुमारवरील पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी पकडून आणल्यानंतरही तो आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असे पोलिसांना भासवीत होता. मात्र पोलिसांनी जेव्हा त्याच्यासमोर पुरावे ठेवले तेव्हा त्याची बोलती बंद झाली. न्यायालयाने त्याला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बँक कर्मचाऱ्यांसोबत ओळख वाढवून काढायचे माहिती
बँके चे मोठे खातेदार कोण आहेत, याची माहिती टोळीतील लोक सतत बँकेत जाऊन आणि कर्मचाऱ्यांना पैसे देऊन माहिती काढत असत. त्या खातेदाराला देण्यात आलेल्या धनादेश मालिकेची माहिती मिळवीत. त्यानंतर त्या खातेदाराच्या नावे असलेल्या धनादेशाचा क्लोन धनादेश तयार करून तो साथीदारांमार्फत अन्य शहरातून वटवून घेत. ही रक्कम परस्पर विविध खात्यात वर्ग करून लगेच काढून घेत. अशा प्रकारे त्यांनी गुजरात, उत्तर प्रदेश, औरंगाबाद, वर्धा आणि मुंबई आदी ठिकाणी फसवणूक केली