साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 07:06 PM2022-02-14T19:06:23+5:302022-02-14T19:15:49+5:30

प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर मोक्षदा यांचा विषय मराठी साहित्य आणि आस्तिक कुमार यांचा हिंदी साहित्य होता. त्यामुळे साहित्यावर तासन्तास चर्चा होत होती.

Matching love through literature, history and social discourse; IAS Astikkumar Pandey selected Maharashtra for IPS wife Mokshada Patil | साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र

साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र

googlenewsNext

- राम शिनगारे
औरंगाबाद : 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', या मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्तीप्रमाणे पहिल्यांदा पाहिल्यावर प्रेमात पडतो. त्यानंतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून ओळख होते. साहित्य, इतिहास आणि समाजिक चर्चेतून मैत्री समृद्ध होत जाते. त्यात भाषा, प्रांत आणि जातीच्या भिंती गळून पडतात. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते अन् आयुष्य सोबतच घालविण्याचा निर्णय होतो. प्रेमासाठी दुसऱ्या राज्याचे केडर स्वीकारले जाते. हा सर्व प्रवास आहे महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय आणि औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा.

२०११ मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत दोघे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पोहोचले होते. २९ ऑगस्ट २०११ रोजी आस्तिक कुमार यांची मोक्षदा यांच्यासोबत पहिली भेट झाली. आस्तिक कुमार यांनी मोक्षदा यांना पहिल्यांदा पाहिले, तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले. प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर मोक्षदा यांचा विषय मराठी साहित्य आणि आस्तिक कुमार यांचा हिंदी साहित्य होता. त्यामुळे साहित्यावर तासन्तास चर्चा होत होती. दुसरे विषय इतिहास आणि समाजशास्त्र. या दोन्ही विषयांतही काहीसे साम्य. त्यातील अनेक बाबींवर चर्चा होत होती. या चर्चेतून दोघांच्या आवडीनिवडी समजल्या. स्वभाव जाणून घेता आले.

सततच्या चर्चेतून दोघे एकमेकांच्या जवळ आले. यात तीन महिन्यांचा कालावधी कसा निघून गेला, हे कळलेच नाही. हा कालावधी संपल्यानंतर मोक्षदा या हैदराबाद येथे पोलीस प्रशिक्षणासाठी गेल्या. तेव्हा मोबाइलवर संभाषण होत होते. याच कालावधीत दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्याविषयीची माहिती दोघांनी आई-वडिलांना दिली. तेव्हा दोघांचा विवाह आंतरजातीय, आंतरराज्य आणि आंतरभाषीय होता. काही प्रश्न उपस्थित झाले. त्या सर्व प्रश्नांना उत्तर 'प्रेम' हेच होते. दोघांचे आई-वडील शेवटी तयार झाले. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर २८ एप्रिल २०१२ ला विवाहबद्ध झाले. आता या प्रेमाला एका मुलाच्या रूपाने पालवीही फुटली आहे.

राज्य शासनाची मोठी मदत
मोक्षदा यांना गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्र केडर मिळाले. त्यामुळे आस्तिककुमार यांनीही एकत्र राहता यावे, यासाठी महाराष्ट्राची निवड केली. त्यांची पहिली पोस्टिंग गडचिरोलीला झाली, तर मोक्षदांची नागपूरला. दुसरी पोस्टिंग नाशिकला, तर मोक्षदांची त्र्यंबकेश्वरला. दोघांची तिसरी पोस्टिंग जळगाव येथे झाली. त्यानंतर हे अकोला येथे झेडपी सीईओ, तर त्या वाशिमला एसपी. तेथून हे बीडला जिल्हाधिकारी झाले, तर त्या औरंगाबाद ग्रामीणला एसपी. बीडहून ते औरंगाबादेत मनपा आयुक्त झाले. त्या ग्रामीणहून औरंगाबाद लोहमार्गला एसपी बनल्या. राज्य शासनाने दोघांनाही सोबत किंवा लगतच्या जिल्ह्यात पोस्टिंग दिली. त्यामुळे एकमेकांपासून खूप दूर जावे लागले नाही, असे पांडेय यांनी सांगितले.

सामंजस्य, विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर या त्रिसूत्रीवर दोघांचा विश्वास आहे. त्यातूनच वाटचाल करीत आलो आहोत. आगामी काळातही त्रिसूत्रीवरच वाटचाल असणार आहे.
- आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त

Web Title: Matching love through literature, history and social discourse; IAS Astikkumar Pandey selected Maharashtra for IPS wife Mokshada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.