शाळेत जाण्यासाठीची बोट माथेफिरुने तोडली; विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 07:15 PM2024-10-11T19:15:24+5:302024-10-11T19:17:49+5:30
अज्ञात माथेफिरुने बोट तोडली;विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच थर्माकॉलचा तराफा
कायगाव : गंगापूर तालुक्यातील शिवना काठावरच्या शेतवस्त्यांवरील मुलांना शाळेत ये-जा करण्याचा जीवघेणा प्रवास थर्माकॉलच्या तराफ्यावर करावा लागतो. या आशयाची बातमी लोकमतने गेल्या वर्षी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे राज्यभर चर्चा होऊन मुंबईचे दिवंगत आमदार भाई सावंत यांच्या कुटुंबियांनी दोन लाखांची बोट या विद्यार्थ्यांसाठी दिली होती. मात्र या बोटीला ६ ऑक्टोबर रोजी कोण्यातरी अज्ञात माथेफिरूने तोडून टाकले. यामुळे या विद्यार्थ्यांच्या नशिबी पुन्हा तोच जीवघेणा प्रवास व तराफा आला आहे.
गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलीकडे आहे. जायकवाडी धरण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना दररोज धरणाच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून हा विषय चव्हाट्यावर आला आहे. आजवर अनेकदा तहसील, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी असे विविध सरकारी विभागाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी येथे पाहणी दौरे केले.
२०२३ साली अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत याबाबतची लक्षवेधी मांडण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याविषयाची स्वतःहून दखल घेतली. याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल करून घेतली. मात्र यातून अद्यापर्यंत तरी काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे लोकमतने या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवासावर गतवर्षी बातमी प्रकाशित केली होती. याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. याची दखल घेत मुंबईचे दिवंगत आमदार भाई सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी २ लाखांची बोट या विद्यार्थ्यांसाठी पाठवून दिली होती. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला होता. मात्र हे सुख कोण्या तरी अज्ञात समाजकंटकाच्या डोळ्यात खुपले व त्याने या बोटीची तोडफोड केली. याबाबत सोमवारी रात्री पालक विष्णू काळे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
६ ऑक्टोबरला बोट झाली गायब
विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेतून आल्यावर शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी सायंकाळी बोट नदीकाठी दोरीच्या साह्याने बांधून ठेवली होती. मात्र रविवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी बोटीच्या नेहमीच्या ठिकाणी पालकांना बोट गायब असल्याचे लक्षात आले. पालकांनी बोटीबाबत स्थानिक मच्छिमारांकडे चौकशी केली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बबन पवार यांना सदर बोट जायकवाडी धरणाच्या संपादित क्षेत्रातील पाण्यात बुडालेली आढळली. कोण्या तरी अज्ञात समाजकंटकाने ती बोट तोडून टाकल्याने सदर दोन लाखांची बोट निकामी झाली आहे.
विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या
या शेतवस्तीवरील विद्यार्थी व विद्यार्थिनींना थर्माकॉलच्या तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. मात्र या बोटीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र अज्ञाताने या बोटीची तोडफोड केल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा तराफ्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. तुटलेली बोट पाहून रविवारी विद्यार्थिनी धायमोकलून रडल्या. यावेळी पालकांना त्यांना आवरणे कठीण झाले होते.