मातोश्रीचा आशीर्वाद चंद्रकांत खैरेंनाच; लोकसभेच्या तयारीला लागण्याचे दिले संकेत
By बापू सोळुंके | Published: February 9, 2024 06:25 PM2024-02-09T18:25:10+5:302024-02-09T18:25:37+5:30
शिवसेना उबाठाने छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केल्याची चर्चा
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्या संभाव्य ११ लोकसभा उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे वृत्त आहे. यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. खैरे यांना लोकसभेची तयारी करण्याचे संकेत मातोश्रीने दिल्याची माहिती आहे.
महिनाभरात आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची महाविकास आघाडी एकत्रपणे लोकसभेला सामोरे जाणार आहे.
यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. किमान समान कलमी कार्यक्रम ठरल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ४८ जागांचे वाटप होईल. असे असले तरी शिवसेना उबाठाने छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केल्याची चर्चा सुरू आहे. यात छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्येही खैरे हेच संभाव्य उमेदवार असतील, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले होते.
याविषयी खैरे यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असे संकेत यापूर्वीच आपल्याला मिळाले आहे. असे असले तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपाचा निर्णय होईल आणि यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी घोषित होईल.