बाब-यात एकाच रात्री पाच चो-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:46 AM2017-12-28T00:46:25+5:302017-12-28T00:46:41+5:30

फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून गावातील तीन सराफा दुकाने व दोन घरांची कुलपे तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे.

 Matter-in-five-four in one night | बाब-यात एकाच रात्री पाच चो-या

बाब-यात एकाच रात्री पाच चो-या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बाबरा : फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून गावातील तीन सराफा दुकाने व दोन घरांची कुलपे तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे.
संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपल्याने गावातील तिन्ही सराफा दुकानदारांनी चांदीचा माल दुकानात सजवून ठेवला होता, तर दुसºया दिवशी बाजार असल्याने त्यांनी हा माल आपल्या काचेच्या रॅकमध्ये ठेवला होता. या चोरीच्या घटनेत शिवनारायण सोनवणे या व्यापाºयाचे जास्त नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री ८ वाजेदरम्यान या तिन्ही दुकानदारांनी आपापली दुकाने नेहमीप्रमाणे बंद केली. रात्री दीड वाजेच्या सुमारास केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीतच या चोरट्यांनी तिन्ही दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला व चांदीचे संपूर्ण दागिने भरून पळ काढला. शिवनारायण सोनवणे यांच्या दुकानातील जवळपास एक गोणी दागिने व रोख साठ हजार आठशे रुपये, असा एकूण चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, पोलीस अधिकारी चौकशी करीत आहेत. चोरट्यांनी सीसीटीव्हीचे रिसीव्हर समजून डिश टीव्हीचे रिसीव्हर चोरून नेले. तसेच शांताराम इंगळे यांच्या दुकानातून १ किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम १३ हजार रुपये तसेच सीसीटीव्हीचे रिसीव्हर, असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नरेंद्र वानखेडे यांच्या दुकानातून दीड किलो चांदीचे दागिन, रोख रक्कम दोन हजार रुपये, असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज पळवला.
या सराफा दुकानाच्या बाजूलाच असलेल्या कमलबाई मधुकरराव मुळे यांच्या घरीही चोरांनी हात मारला. चोरट्यांनी या घरातील ३ ते ४ तोळे सोन्याचे दागिने (किंमत एक लाख दहा हजार रुपये), १५ हजारांचे चांदीचे दागिने व जवळपास ३० हजार रुपयांच्या भारी साड्या, असा एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही तिन्ही दुकाने व हे घर एकाच गल्लीत शेजारीच आहे, तर श्री बालाजी मंदिराच्या पाठीमागील गल्लीतील राजू त्र्यंबके यांच्या घराचा कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला; परंतु तेथे त्यांना काहीच सापडले नाही.
चोरीचे सत्र संपल्यानंतर थोड्याच वेळात बाजूला राहत असलेल्या शांताराम इंगळे यांनी उठून खिडकीतून बाहेर पाहिले, तर चोरटे दुचाकीवर पसार झाल्याचे दिसले. इंगळे यांनी सोनवणे यांना फोन करून बोलावून घेतले व आपल्या दुकानाकडे जाऊन बघितले असता चोरट्यांनी दुकानांचे शटर उचकटल्याचे दिसून आले. गल्लीत आवाज येत असल्याने गावकरी जमा झाले. या घटनेची माहिती इंगळे यांनी वडोदबाजार पोलीस ठाण्याला दिली असता दोन पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली.
संक्रांत बाजारावर ‘संक्रांत’
या घटनेमुळे आजचा सणाचा बाजार या दुकानदारांना करता आला नसल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अर्चना पाटील या करीत आहेत.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
बुधवारी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भुजंग यांनीही आपल्या फौजताफ्यासह पाहणी केली.
त्यांनी सांगितले की, या चोरीची अगोदर रेकी करण्यात आली असावी. सीसीटीव्ही फुटेज तपासून या चोरीचा लवकरात लवकर छडा लावण्यात येईल. ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. सपोनि. अर्चना पाटील यांनी नुकताच या ठाण्याचा कार्यभार हातात घेतला असून, त्यांनी आल्या-आल्याच अवैध धंदे बंद करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यांनी श्वानपथकाला पाचारण केले.
श्वानपथकाने गावातील तिन्ही दुकानांत जाऊन मुळेंच्या घराचाही माग घेत वाहेगाव शिवारातील गट नं. ११२ मधील ताराबाई सोमीनाथ श्रीखंडे यांच्या शेतापर्यंत माग काढला. या शेतात दोन गोण्यांतील उपयोगी दागिने तसेच वस्तू काढून घेण्यात आल्या, तर उर्वरित सामान तेथेच सोडून चोरट्यांनी पोबारा केला.

Web Title:  Matter-in-five-four in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.