'मॅट'च्या पदावनतीच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:02 AM2021-04-28T04:02:02+5:302021-04-28T04:02:02+5:30
औरंगाबाद : याचिकाकर्ता मंडल अधिकारी शंकर रामलाल राठोड यांच्या पदाबाबत पुढील सुनावणीपर्यंत आहे ती परिस्थिती ठेवण्याचा आदेश ...
औरंगाबाद : याचिकाकर्ता मंडल अधिकारी शंकर रामलाल राठोड यांच्या पदाबाबत पुढील सुनावणीपर्यंत आहे ती परिस्थिती ठेवण्याचा आदेश खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी नुकताच दिला आहे.
खंडपीठाने महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, परभणीचे जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि यशवंत सोडगीर यांना नोटीस बजावण्याचाही आदेश दिला आहे. याचिकेवर १७ जून २०२१ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
राठोड सध्या गंगाखेड तालुक्यामधील माखनी येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ५ मार्च २०२१ रोजी जिल्हा निवड समितीच्या बैठकीत मुंबई येथील प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) २०१५च्या निर्देशानुसार तलाठी संवर्गाची सुधारित ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. त्यात राठोड यांचा ३६५वा क्रमांक होता. मॅटच्याच २०१७च्या आदेशानुसार ज्यांनी ४ प्रयत्नात किंवा ३ वर्षात ''दुय्यम सेवा परीक्षा आणि महसूल अर्हता' ही खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण केली असेल अशांना तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचे आदेशित केले होते. ज्यांनी विहित मुदतीत ही परीक्षा उत्तीर्ण केली असेल अशांची नावे पदोन्नतीच्या यादीत वरच्या क्रमांकावर घेण्यात यावीत, असेही या आदेशात म्हटले होते .राठोड २००२ सालीच या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते .त्यांना २०१७ला मंडल अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. मुंबई येथील मॅटच्या त्रिसदसीय पीठाच्या निकालानुसार १२ मार्च २०२१ला राठोड यांना पदावनत केले. यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले यशवंत सोडगीर यांना पदोन्नती दिली. या आदेशापूर्वीच्या पदोन्नत्या आहेत तशाच ठेवाव्यात असेही मॅटच्या निकालात म्हटले असताना राठोड यांना पदावनत केले. म्हणून त्यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत त्यांच्या पदावनतीला खंडपीठात आव्हान दिले आहे. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील यावलकर काम पाहात आहेत.