‘माऊली-माऊली, गुरूराज माऊली’
By Admin | Published: November 14, 2016 12:45 AM2016-11-14T00:45:22+5:302016-11-14T00:43:21+5:30
बीड कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने कपिलधार येथील मन्मथस्वामी मंदिरात होत असलेल्या यात्रोत्सवात रविवारपासून दिंड्यांचे आगमन सुरू झाले आहे.
राजेश खराडे बीड
कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने कपिलधार येथील मन्मथस्वामी मंदिरात होत असलेल्या यात्रोत्सवात रविवारपासून दिंड्यांचे आगमन सुरू झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सिडको, लोहा येथील दिंड्या दाखल होऊन ‘गुरूराज माऊली’चा जयघोष करून कीर्तन, प्रवचन इ. धार्मिक कार्यक्रमांनी कपिलधारच्या निसर्गरम्य वातावरणात भक्तीचा मळा फुलला. सोमवारी काल्याचे कीर्तन होऊन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिंडीचे आगमन होताच शासकीय महापूजा पार पडणार आहे.
कार्तिकी पौर्णिमेदिवशीच मन्मथस्वामी यांना साक्षात्कार झाला असल्याची आख्यायिका आहे. १५३५ साली मन्मथस्वामी यांनी येथे संजीवन समाधी घेतली असून, दरवर्षी शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याकरिता राज्यातून, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक या परराज्यांतूनही पायी दिंड्या दाखल होत आहेत. कपिलधारकडे जाणाऱ्या सर्व दिंड्यांचे रविवारी जिल्ह्यात आगमन झाले होते. जागोजागी दिंडीतील भाविकांची सोय करण्यात आली होती. आंध्र प्रदेशातील बिचकुंडा दिंडीत हजारो भाविकांसह तेथील आमदार, खासदार गेल्या अनेक वर्षांपासून पायी सहभागी होतात. सोमवारी कार्तिकी पौर्णिमेच्या सकाळी ११ पर्यंत सर्व दिंड्या दाखल होणार असून, सुमारे ३ लाख भाविकांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होणार आहे. शिवाय, मांजरसुंबा घाटात रिंगण सोहळा व लिंगायत समाजाचा महामेळावा २६ पटातील शिवाचार्यांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवारपासून मंदिरात भाविकांच्या भोजनाची माफक दरात सोय करण्यात आली असून, दर्शन रांगांचेही नियोजन करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने कार्तिकी पौर्णिमेपर्यंत येथील धबधबा वाहत असून, अनुकूल परिस्थितीमुळे भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम, शासकीय महापूजा व मेळाव्यात समाज जागृती करून यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.