घनसावंगीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:37 AM2017-08-28T00:37:39+5:302017-08-28T00:37:39+5:30
जालना शहरासह परिसरात रविवारी मध्यम पाऊस झाला. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/परतूर : जालना शहरासह परिसरात रविवारी मध्यम पाऊस झाला. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेतला. परतूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. परतूरमध्ये काही भागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती कामांवर परिणाम झाला आहे.
शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाडाही जाणवत होता. सकाळी अकरा वाजता पावसाला सुरुवात झाली. अर्धातास हजेरी लावल्यानंतर पाऊस थांबला. दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. भोकरदन नाका, बसस्थानक, मामा चौक, सावरकर चौक, गांधीचमन मस्तगड या भागात वाहन धारकांची गैरसोय झाली. रात्री आठच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. तालुक्यातील निधोना, घाणेवाडी, आंबेडकरवाडी, गुंडेवाडी, जामवाडी, पानशेंद्रा शिवारातही पाऊस झाला. जालना तालुक्यात रविवारी सकाळी ७.७५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.
परतूर तालुक्यात दुपारी आष्टी, सातोना, श्रीष्टी सर्कलमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर परतूर व वाटूर सर्क लमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली. आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने काही भागात शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे मशागतीचे कामे ठप्प आहेत. परतूर तालुक्यात २० मिमी पावसाची नोंद झाली. अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात रविवारी ५ ते ७ सुमारे पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचे पाणी गावातील रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते. मंठपिंपळगाव परिसरात सलग तिसºया दिवशीही पाऊस पडला. अंबड व घनसावंगी तालुक्यात अनुक्रमे ११ व १६.५७ मिलीमिटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ३७६.६० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.