‘मे हिट’ने बीडकर झाले घामाघूम
By Admin | Published: May 6, 2017 12:10 AM2017-05-06T00:10:39+5:302017-05-06T00:10:59+5:30
बीड : एप्रिलपर्यंत चाळिशीच्या आसपास असलेला पारा मे उजाडताच दोन अंशांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे बीडकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एप्रिलपर्यंत चाळिशीच्या आसपास असलेला पारा मे उजाडताच दोन अंशांनी पुढे सरकला आहे. त्यामुळे बीडकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत. पोळणाऱ्या उन्हाचे चटके असह्य होत असून, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे.
सकाळी सात वाजेपासूनच ऊन जाणवायला सुरुवात होते. दिवसभर त्याची तीव्रता कायम असते. सायंकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत ही धग अशीच राहते. रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे मुश्किल बनत असून, या काळात जनजीवन ठप्प होऊन जाते. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. वाढत्या उन्हामुळे रसाळ फळांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.
शिवाय, ज्यूस बार, रसवंती गजबजून गेल्या आहेत. बर्फालाही वाढती मागणी आहे. उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे शासकीय, तसेच खाजगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ४१-४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत.
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण महिनाभर उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हापासून बचावासाठी गॉगल, गमछे, टोप्या वापरण्यावर नागरिकांचा भर असून, कुलर, ए.सी., पंख्यांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र आहे.
वऱ्हाडींची लाही-लाही
लग्नसराईही असल्यामुळे बसगाड्या खचाखच भरून जात आहेत. खाजगी वाहनांनाही पसंती आहे. लग्न समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या आबालवृद्धांचेही उन्हामुळे हाल होत आहेत. हजारो वऱ्हाडींसाठी थंड पाणी व सावलीची सोय करताना वधू पक्षाची तारांबळ उडताना दिसून येत आहे.