घाटी रुग्णालयाच्या भिंतींनाही फुटला मायेचा पाझर; अंधाला सोडून नातेवाईक गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 07:30 PM2020-12-23T19:30:51+5:302020-12-23T19:31:54+5:30
Ghati Hospital of Auranagabad : आपल्याला कोणीच नाही, असे सांगत त्यांनी घरच्यांविषयी माहिती देण्याचे टाळले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : स्थळ घाटीतील ग्रंथालयासमोरील रस्ता. अंध ज्येष्ठाला कोणीतरी घाटीत सोडून गेले. अंधत्वाने विद्रूप झालेले डोळे दिसू नयेत, म्हणून चेहऱ्यावर रुमाल बांधलेला. नातेवाईकांनी साथ सोडली, तरी आपल्याला कोणीच नाही म्हणून ‘तो’ त्यांचे नावही घेत नव्हता. हे दृश्य पाहून घाटीच्या कर्मचाऱ्यांनाच काय भिंतींनाही मायेचा पाझर फुटला.
घाटीत रस्त्याच्या कडेला उन्हात हा ज्येष्ठ बसला होता. येणारे-जाणारे क्षणभर थांबत होते. काहींनी शंका म्हणून विचारणा केली, तेव्हा डोळे नसल्याने रूमाल बांधल्याचे त्या ज्येष्ठाने सांगितले. तरीही कोणाला विश्वास बसत नव्हता. शेवटी ‘त्या’ ज्येष्ठाने रूमाल हटविला आणि अंधत्वाचा पुरावाच दाखविला. हे दृश्य पाहणारे क्षणभर स्तब्धच झाले. परिचारिका संगीता सावंत यांनी ज्येष्ठाला रस्त्यावरून उचलून सावलीत बसविले. कोण आहे, कोणी सोडले, अशी त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, आपल्याला कोणीच नाही, असे सांगत त्यांनी घरच्यांविषयी माहिती देण्याचे टाळले.
पुनर्वसनासाठी प्रयत्न
वृद्धांची मुले, नातेवाईकच त्यांना घाटीत सोडून जात असल्याचे दिसून येत आहे. दर महिन्याला किमान पाच-सहा अनोळखी लोकांना तरी घाटी परिसरात सोडून देण्यात येते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच बेवारस लोकांचे मनपाच्या मदतीने पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु पुन्हा नवीन लोक घाटीत सोडण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केला जाईल.
आई-वडिलांनी केला सांभाळ
माझे कोणी नाही, आई-वडील होते, तोपर्यंत त्यांनी माझा सांभाळ केला. ते वारल्यानंतर असेच जगत आहे, असे त्या अंधाने सांगितले. कुठे राहतो, हे सांगणेही त्यास कठीण झाले होते.