...तर मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:13 AM2017-10-30T01:13:01+5:302017-10-30T01:13:06+5:30
बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्टÑीय अध्यक्षपद स्वीकारावे, असे मला वाटते’ अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या प्रक्रियेत यावे, त्यांचे नेतृत्व मानायला मी तयार आहे. किंबहुना बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्टÑीय अध्यक्षपद स्वीकारावे, असे मला वाटते’ अशी प्रतिक्रिया आज येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं ए चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ‘अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेबांचे नातू म्हणून आम्हाला आदरच आहे. माझ्या मंत्रिपदाबद्दल त्यांना आदर आहे की नाही माहीत नाही; पण बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवून बाबासाहेबांच्या स्वप्नातले राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे उद्गारही आठवले यांनी काढले.
आम्ही रा.स्व. संघासोबत नाहीत. आम्ही भाजपबरोबर, नरेंद्र मोदींबरोबर आहोत. नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान बदलले जाण्याची आम्हाला सूतराम शक्यता वाटत नाही. त्या केवळ वावड्या आहेत, असे सांगत ताजमहालवरून सुरू झालेली चर्चा निरर्थक आहे. ताजमहाल ही एक सुंदर कलाकृती आहे. जगातले आश्चर्य आहे. त्यावरून वाद उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.
शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी दलित योजनांचे पाचशे कोटी रुपये महाराष्टÑ शासनाने वळवल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत आठवले यांनी यासंबंधीचा कायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये मुस्लिम आणि दलित काँग्रेसच्या बाजूने नाहीत. पाटीदार समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्या आम्ही विरोधात आहोत. इतकेच नव्हे तर मराठा, जाट, ठाकूर, ब्राह्मण, राजपूत या मोठ्या जातींना ओबीसीत समाविष्ट करून घ्यायला आमचा विरोध आहे; पण आरक्षणाची मर्यादा आणखी २५ टक्के वाढवून त्यांना देण्यास आमची हरकत नाही.
मनसेने कायदा हातात घेऊ नये. दादागिरी त्यांनाच करता येत नाही. मुंबईच्या फेरीवाल्यांनीही आपला संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पाहू नये. अन्यायाचा मुकाबला करावा, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.
बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, किशोर थोरात, संजय ठोकळ, सुनील मगरे,श्रावण गायकवाड, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, कमलेश चांदणे आदींची यावेळी उपस्थिती होती.