‘शाही’ पाहुणचारानंतर महापौर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:08 AM2017-09-11T01:08:35+5:302017-09-11T01:08:35+5:30
महापौर परिषदेचा समारोप करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात प्रथमच महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या दुसºया दिवशी महाराष्टÑासह देशभरातून आलेल्या महापौरांनी अजिंठा, वेरूळसह पाणचक्की, बीबीका मकबरा आदी पर्यटन स्थळे पाहणे पसंत केले. सायंकाळी महापौर बंगल्यावर पाहुण्यांना शाही भोजन देण्यात आले. गजलच्या कार्यक्रमासह महापौर परिषदेचा समारोप करण्यात आला.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापौर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटन झाल्यानंतर महाराष्टÑ आणि देशभरातील महापौरांनी एक चर्चासत्र घेतले. यामध्ये विविध ठराव संमत करण्यात आले.
लवकरच हे ठराव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. महापौरांना प्रशासकीय, आर्थिक अधिकार असावेत. महापौर थेट जनतेतून निवडण्यात यावा, त्याचा कार्यकाळ ५ वर्षांचा असावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. रविवारी सकाळी २६ महापौर सलीम अली सरोवराजळील मनपाचे जलशुद्धीकरण केंद्र, सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची पाहणी करणार होते. ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सर्व महापौरांनी भ्रमंतीला अधिक पसंत दिली.
त्यांना बीबीका मकबरा, पाणचक्की ही दोन ऐतिहासिक पर्यटन स्थळे दाखविण्यात आली. त्यानंतर वेरूळ, खुलताबादही दाखविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पाहून महापौर आवाक झाले होते. पर्यटन उद्योग वाढविण्यासाठी औरंगाबादेत खूप वाव असल्याचे अनेक महापौरांनी नमूद केले.
सायंकाळी महापौर बंगल्यावर सर्व पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन महापौर बापू घडामोडे यांच्यातर्फे करण्यात आले होते. त्यासाठी सकाळपासूनच महापौर बंगल्यावर जोरदार तयारी सुरू होती. सायंकाळी गजलच्या मंजूळ स्वरांसह पाहुण्यांना जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व महापौरांची रवानगी करण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व माजी महापौरांना निमंत्रित करण्यात आले होते. महापौर बंगल्यासमोरील रोडवर बरेच खड्डे पडले आहेत. युद्धपातळीवर मनपा प्रशासनाने सकाळी रस्त्यांचे डांबर टाकून पॅचवर्क केले हे विशेष.