महापौर परिषदेत विविध ठराव संमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:05 AM2017-09-10T01:05:43+5:302017-09-10T01:05:43+5:30
शहरात प्रथमच दोनदिवसीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या महापौरांनी सायंकाळी विविध ठराव संमत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात प्रथमच दोनदिवसीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या महापौरांनी सायंकाळी विविध ठराव संमत केले.
औरंगाबाद शहरात यापूर्वी उपमहापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर परिषदेचे आयोजन करण्याचा मान पहिल्यांदाच मिळाला. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुसºया सत्रात चर्चासत्राचे आयोजन केले होते. परिषदेसाठी महाराष्टÑातील नाशिक, पुणे, मुंबई, नागपूरसह देशभरातील महापौर उपस्थित होते.
यामध्ये महापौरांचे अधिकार यासह विविध विषयांवर मंथन करण्यात आले. सायंकाळी पाच प्रमुख ठराव संमत करण्यात आले. या ठरावाची प्रत राज्य व केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.
महापौरांचा कार्यकाळ सध्या अडीच वर्षांचा आहे. हा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा या मुद्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. महापौरांची निवडणूक थेट जनतेतून करण्यात यावी या मागणीला देशभरातील महापौरांनी पाठिंबा दर्शविला. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापौरांची भूमिका महत्त्वाची असावी यावर सर्वांनी होकार दर्शविला. केंद्र व राज्य शासनाच्या विकासात्मक योजनेत महापौरांचाही सल्ला घेण्यात यावा. डिसेंबर महिन्यात दिल्ली किंवा मुंबई येथे देशभरातील महापौरांचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी महापौर परिषदेचे अध्यक्ष विवेक शेजवलकर उपस्थित होते. चर्चासत्रात महापौर बापू घडमोडे यांनी विविध मुद्दे मांडले.