महापौर, उपमहापौर निवडणूक आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:14 AM2017-10-29T01:14:44+5:302017-10-29T01:14:55+5:30

ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना रविवारी मिळणार आहे.

Mayor, Deputy Mayor election today | महापौर, उपमहापौर निवडणूक आज

महापौर, उपमहापौर निवडणूक आज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे २२ वे महापौर होण्याचा मान शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना रविवारी मिळणार आहे. आतापर्यंतच्या महापौर निवडणुकांमध्ये महापौर, उपमहापौरांना जेवढे मतदान झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान घोडेले यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम ते आज प्रस्थापित करतील, असा कयास लावण्यात येत आहे.
शिवसेना-भाजप युती दुभंगण्याच्या मार्गावर असताना महापौर निवडणुकीच्या तब्बल २५ दिवस अगोदर शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे युतीचा संसार तुटता तुटता वाचला. भाजप नेत्यांची मनधरणी करून अखेर घोडेले यांनी पाठिंबा मिळविला. मागील आठवड्यात भाजपने जड अंत:करणाने घोडेले यांना पाठिंबा दिला. २५ आॅक्टोबर रोजी भाजपने निष्ठावंतांना डावलून अत्यंत नवख्या उमेदवाराला उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. विजय औताडे यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. यातून घोडेले यांना खूप काही फायदा झाला नाही. उलट अडीच वर्षे भाजपला तोटाच सहन करावा लागणार आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. युतीच्या उमेदवारांना ८० पेक्षा अधिक मते पडण्याची शक्यता आहे. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम काम पाहणार आहेत. मागील निवडणुकांप्रमाणेच यंदाही नगरसेवकांना हात उंचावून सभागृहात मतदान करावे लागणार आहे.
शिवसेना-भाजप युतीचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. रविवारी सकाळी ते शहरात दाखल होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता सर्व युतीचे नगरसेवक एकत्र मनपात दाखल होणार आहेत. सर्वच पक्ष खबरदारीचा उपाय म्हणून व्हीप जारी करणार आहेत.

Web Title: Mayor, Deputy Mayor election today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.