महापौर निवडणूक: अर्ज भरण्यास तीन दिवस मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:02 AM2017-10-18T01:02:33+5:302017-10-18T01:02:33+5:30
: महापौर, उपमहापौर निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर, उपमहापौर निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. रविवार सुटीचा दिवस असतानाही निवडणूक घेण्यात येणार आहे, हे विशेष. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, २४ ते २६ आॅक्टोबरदरम्यान अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ २८ आॅक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर अडीच वर्षांसाठी महापौरपद हे इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. उपमहापौरपदासाठी आरक्षण नाही. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता २४ ते २६ आॅक्टोबर हा तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अर्जाचे वितरण २४ व २५ दोन दिवस होणार आहेत. विशेष सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने सेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. अडीच वर्षे सेनेवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपला ज्येष्ठ नगरसेवकाची उपमहापौरपदी वर्णी लावावी लागेल. बापू घडमोडे यांच्या निमित्ताने भाजपला दहा महिने महापौरपद मिळाले. मात्र, या दहा महिन्यांचा सदुपयोग भाजपला करता आला नाही. त्यांचा कार्यकाळ सुखद जाऊ नये यासाठी भाजपमधील अंतर्गत विरोधकांनी महापौरांना कायमच विरोध केला.