मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

By साहेबराव हिवराळे | Published: July 29, 2023 06:24 PM2023-07-29T18:24:32+5:302023-07-29T18:25:25+5:30

५० कोटींतून रस्ते पुन्हा चकचकीत बनण्याची आशा

Mayur Park or 'Chikhaldara'? The roads were dug for the water channel, now there is a swamp | मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

मयूर पार्क की ‘चिखलदरा’? जलवाहिनीसाठी खोदून ठेवले रस्ते, तेथे साचली आता दलदल

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडलगत उदयास आलेल्या मयूर पार्कचे रस्ते छान गुळगुळीत होते. पण जलवाहिनीच्या कामासाठी ते खोदले गेले... पावसाळा सुरू झाला अन् दलदल बनली... स्मार्ट सिटीतून रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर आहे. यामुळे रस्ते त्वरित पुन्हा गुळगुळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

हर्सूल टी पॉईंटजवळच बिल्डरने हा प्रकल्प उभारला होता. खूप नागरिकांनी मयूर पार्कमध्ये प्लॉट, फ्लॅट घेतले. सोसायट्या स्थापन केल्या. पण अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले, तेव्हा थातूरमातूर रस्ता केला गेला. तो रस्तादेखील एका पावसात होता की नव्हता झाला. मयूर पार्क, कार्तिकनगर हा चिखल पार्क झालेला आहे. एसबीओए ते देवगिरी बँकेपर्यंत हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून मंजूर झालेला आहे. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे. महिन्याभरापूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील या परिसराला भेट दिली होती.

शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणार
मयूर पार्क हा शहरातील पहिला स्मार्ट वॉर्ड ठरणार असून, १०० किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकून सर्वांना मुबलक पाणी पुरवठा केला जाणार आहे. जलवाहिनीसाठी रस्ते उखडले. त्याचा पावसामुळे नागरिकांना थोडाफार त्रास झाला; परंतु तो आता कमी होईल. कारण ५० कोटींतून रस्ते पुन्हा गुळगुळीत होणार आहेत.
- विजय औताडे, माजी नगरसेवक 

तुम्ही शहरात राहता की खेड्यात...?
जेव्हा पाहुणे म्हणतात, तुम्ही खेड्यात राहता की शहरात? तेव्हा निरूत्तर होतो. डांबरी रस्ता पाइपलाइनमुळे उखडला; त्यात पाणी तुंबले. खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
- आशिष जोशी (नागरिक)

समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?
एसबीओसमोरचा पूर्वेकडील समांतर रस्ता एक वर्षापासून खोदून ठेवला आहे. तेथे डबके साचते. जनतेला कोणी वाली नाही. घरपट्टी, नळपट्टी वसुली मात्र जोरात सुरू आहे. सध्या नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?
- विद्या साळवे, रहिवासी

सांडपाण्याची विल्हेवाट कशी? 
नाले चोकअप असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- अप्पासाहेब चंद्रटिके, रहिवासी

कर नियमितपणे भरतो...
रहिवाशांना चार महिने समस्या भेडसावतात. त्यांचे एकदाचे निराकरण करावे, कारण बहुतांश जण मनपाला कर अदा करतात.
- ममराज राठोड, रहिवासी

आणखी प्रयत्नांची गरज
सविता सुरे, सीताराम सुरे आणि विजय औताडे हे नगरसेवक राहिले असून त्यांनी काही विकासकामे केलेली आहेत. शासनाचाही निधी येथे लोकप्रतिनिधींनी खर्च केलेला आहे. पण आता चिखलमुक्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Mayur Park or 'Chikhaldara'? The roads were dug for the water channel, now there is a swamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.