माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप कागदावर, महिलांची गर्दी सेतूवर
By विकास राऊत | Published: July 4, 2024 01:37 PM2024-07-04T13:37:53+5:302024-07-04T13:40:45+5:30
३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर : माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन अपलोड होणार आहे. त्यासाठी असलेले ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप अजून सुरूच झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रमाणपत्र घेऊन महिलांनी बुधवारी सकाळी ८ पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी केली. तीन दिवसांत एकाही लाभार्थ्याचा अर्ज योजनेसाठी अपलोड झालेला नाही. कारण ॲपच सुरू झालेले नाही.
अर्ज भरण्यासाठी मुदत, ऑनलाइन प्रक्रिया होणार आहे. असे प्रशासनाने वारंवार सांगूनही महिलांची गर्दी दिवसभर तशीच होती. योजना चांगली आहे, परंतु त्यासाठीची प्रक्रिया किचकट असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. तर योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी साध्या वेशात प्रशासनातील पथक सेतू केंद्रावर टेहळणी (रेकी) करणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जि. प. सीईओ डॉ. विकास मीना यांची उपस्थिती होती.
रहिवासी, उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही
रहिवासी प्रमाणपत्राऐवजी १५ वर्षांपासून राज्यात राहत असल्याचे पुरावे ग्राह्य धरले जातील. त्यात रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेच्या जन्म प्रमाणपत्रापैकी कुठलाही पुरावा असेल तर रहिवासी प्रमाणपत्राची गरज नाही. महिलांनी पिवळे, केशरी रेशनकार्ड झेरॉक्स प्रत दिली तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल. ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरला तरी जुलैचाही लाभ लाभार्थ्यांना मिळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
कोणत्याही बँकेचे खाते चालेल
शून्य बॅलन्स असलेले कोणत्याही बँकेचे खाते योजनेसाठी चालेल. यासाठी बँकांना सूचना दिल्या आहेत. आधार लिंक, केवायसी असणे गरजेचे असेल. ऑफलाइन अर्ज घेण्यात येणार नाही. अर्ज ऑनलाइन पाठवावेत. १५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळत असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अनुदान १ हजार असेल तर ५०० रुपयांचे अनुदान या योजनेतून दिले जाईल. १५०० रुपयांचे एकूण अनुदान देण्याचा प्रयत्न यातून होईल.
अर्जदार काय म्हणतात?
योजना चांगली आहे. ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळत नाही, परंतु त्या गरजू आहेत. त्यांना या योजनेतून साहाय्य मिळेल.
-अर्जदार, पडेगाव
योजनेसाठी मुदतवाढ हवी. तसेच मोबाइल वापरणे सगळ्याच महिलांना जमत नाही. ऑफलाइन अर्जही घ्यावेत.
-अर्जदार, ब्रिजवाडी