गोवरचे निदान आता औरंगाबादेतच; अवघ्या ६ तासांत मिळणार अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:23 PM2022-11-29T15:23:42+5:302022-11-29T15:24:01+5:30
घाटीतील व्हीआरडीएल लॅबमध्ये सुविधा, कोरोनापाठोपाठ गोवरचीही होणार चाचणी
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) व्हीआरडीएल लॅबमध्ये गोवर चाचणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. अवघ्या ६ ते ८ तासांत चाचण्यांचे निदान होऊन अहवाल उपलब्ध होऊ शकतील. यासंदर्भात मनपा, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी दिली.
राज्यात मुंबई, भिवंडी, मालेगाव आदी भागांमध्ये गोवरचा उद्रेक सुरू असून, औरंगाबादेतही संशयित रुग्ण आढळत आहेत. काही रुग्णांचे नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. औरंगाबादेतील संशयित रुग्णांना गाेवर आहे की नाही, याचे निदान होण्याची भिस्त आतापर्यंत मुंबईवरच होती. कारण संशयितांचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते आणि अहवाल येण्यासाठी किमान ६ ते ७ दिवस जात होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर यापुढे गोवरची चाचणी घाटीत होणार आहे.
२९ मार्च २०२० रोजी घाटीत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि शहरातच कोरोनाची तपासणीची सुविधा सुरू झाली. यासाठी तत्कालीन अधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे यांनी परिश्रम घेतले. घाटीत ही सुविधा सुरू होण्यापूर्वी संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत होते. अहवाल येण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु, घाटीत तपासणी सुरू झाली आणि काही तासांमध्ये अहवाल मिळण्यास सुरुवात झाली. आता गोवरचेही अहवाल काही तासांत मिळू शकणार आहेत.
लसीकरण, रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड
गोवरच्या रुग्णांच्या दृष्टीने औषधी उपलब्ध आहेत. गोवर लसीकरण आणि रुग्णांसाठी वाॅर्ड क्रमांक ४ सुसज्ज ठेवण्यात आला आहे. गोवर साथीच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना कोरोनादरम्यान देण्यात आलेले आहे, अशी माहिती डाॅ. संजय राठोड यांनी दिली.
माहिती उशिरा, नमुने रवाना
घाटी रुग्णालयात गोवरची चाचणी उपलब्ध आहे, यासंदर्भात मनपाला सायंकाळी उशिरा माहिती मिळाली. तोपर्यंत ९ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला रवाना झाले होते.