पाण्याच्या मापात पाप
By Admin | Published: November 25, 2014 12:55 AM2014-11-25T00:55:35+5:302014-11-25T01:01:37+5:30
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे. हे पाण्याच्या मापात पाप असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनीच सुरू केला आहे.
दोन दिवसांआड पाणीपुरवठा करायचा आणि त्यातही १५ मिनिटांची दांडी मारायची असा नित्यक्रम दोन महिन्यांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. नवीन जलवाहिनीची बंद असलेली कामे आणि पाण्याचा तुटवडा यातून मार्ग काढण्यात पालिका प्रशासन आणि पदाधिकारीदेखील असमर्थ ठरत असल्याचे दिसते आहे. आगामी काळात नागरिकांचा उठाव होऊन मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन जलवाहिनीची कामे बंद आहेत. मुख्य जलवाहिनीचे काम अजून कंपनीने सुरू केलेले नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पाणीपुरवठा सुरू होतो, तेव्हा कंपनीचा कुठलाही कर्मचारी पाणीपुरवठा होतो किंवा नाही याचा आढावा घेत नाही. पाण्याचा दाब, शेवटच्या घरापर्यंत पोहोचते की नाही, शिवाय, कंपनीने कुठलीही पाहणी न करताच यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे.
कंपनी मनपाची जावई आहे का?
उपमहापौर संजय जोशी म्हणाले अभियंते बटीक झाले आहेत. कंपनी मनपाची जावई आहे, अशा थाटात अधिकारी कंपनीची खातरदारी करीत आहेत. कंपनीकडे काहीही डेटा व नियोजन नाही. शहराला योजनेतून काहीही फायदा मिळालेला नाही. योजनेतून शून्य आऊटपूट असून १ लिटरही जास्तीचा पाणीपुरवठा वाढलेला नाही. १
दूषित पाणीपुरवठा अजूनही सुरू आहे. काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतो आहे. त्याचा शोध कंपनीने बंद केला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर कोण जबाबदार, असा सवाल आहे.
२१० नोव्हेंबरपासून दूषित व गढूळ पाण्याची ओरड सुरू आहे, तर दुसरीकडे ३ हजार ५० रुपयांची पाणीपट्टी बिलाच्या नोटीसचा भडिमार कंपनीने सुरू केला आहे.
३ काही नागरिकांनी एप्रिलमध्ये पाणीपट्टी भरलेली आहे. असे असतानाही त्यांना पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. याचा अर्थ कंपनीकडे नळधारकांचा कुठलाही लेखाजोखा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.४
समांतर जलवाहिनीच्या कंत्राटासाठी केलेले करार समजून घेण्यासाठी होणारी विशेष सभा लांबणीवर पडणार आहे. महापौर कला ओझा यांच्या घरी मंगल कार्य आहे. त्यामुळे विशेष सभा १० डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. ४
तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात योजनेचा करार झाला, तर तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या काळात मनपाची पाणीपुरवठा हस्तांतरित करण्यात आली.