सुरक्षित रस्ते प्रवासासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:40 PM2019-12-10T23:40:42+5:302019-12-10T23:40:49+5:30
खड्डयांची डागडुजी, साईड पंखे भरणे, वाहतूक सिग्नल व मुख्य चौकात पांढरे पट्टे मारणे, जनजागृती फलक उभारणे आदी कामे सुरु करण्यात आली आहेत.
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळावे तसेच सुरक्षित प्रवासाठी जागतिक बँक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सुचनेवरुन विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.
या प्रमुख महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांची डागडुजी, साईड पंखे भरणे, वाहतूक सिग्नल व मुख्य चौकात पांढरे पट्टे मारणे, जनजागृती फलक उभारणे आदी कामे पथकर वसूल करणाºया कंपनीच्या वतीने सुरु करण्यात आली आहेत.
या महामार्गाचे बीओटी तत्वावर जवळपास दशकभरापूर्वी चौपदीकरण करण्यात आले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही घटले होते. मात्र, रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या महामार्गावर असलेल्या दुभाजकावर वाहने धडकून अनेक ठिकाणी दुभाजकांची तुटफुट झाली आहे.
याच बरोबर साईडपंखेही उघडे पडल्यामुळे दुचाकीस्वार व छोट्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. वाळूज व पंढरपूर येथील रस्ता दुभाजकावर बसविण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्याही ठिक-ठिकाणी निखळून पडल्यामुळे लहान-मुले व पादचारी जीव धोक्यात घालून रस्त ओलांडतात.
आठवडाभरापुर्वीच गोलवाडी फाट्यावर भरधाव कार एका झाडावर धडकल्यामुळे यात चार तरुणांचा मृत्यू झाला. हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर दररोज हजारो वाहनधारकांची वर्दळ असते. या महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे सिडको वाळूजमहानगरातील नागरिकांनी वाहतूक शाखा, जागतिक बँक प्रकल्प आदीकडे खड्ड्यांची डागडुजी तसेच जनजागृती फलक लावण्याची मागणी केली होती.
यानंतर जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर खड्डे बुजवून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पथकर वसूल करणाºया के.टी.संगम कन्सट्रॅक्शन कंपनीला देण्यात आल्या आहेत.