घाटीत मोकाट कुत्र्यांच्या तोंडामध्ये मांसाचे गोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:45 PM2018-12-17T23:45:50+5:302018-12-17T23:46:03+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला आणि शवविच्छेदनगृहाच्या परिसरात सोमवारी दोन-तीन मोकाट कुत्र्यांच्या तोंडात मांसाचे गोळे पाहायला मिळाले.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला आणि शवविच्छेदनगृहाच्या परिसरात सोमवारी दोन-तीन मोकाट कुत्र्यांच्या तोंडात मांसाचे गोळे पाहायला मिळाले. याठिकाणी बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकण्यात येत आहे. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
घाटी रुग्णालयात काळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये ओला-सुका कचरा गोळा केला जातो. याबरोबर पिवळ्या आणि लाल रंगांच्या पिशव्यांमध्ये वैद्यकीय घनकचरा गोळा केला जातो. आजघडीला एका कंपनीतर्फे घाटीतील वैद्यकीय घनकचरा गोळा केला जातो. महापालिकेकडून कचरा उचलणे बंद असल्याने ओल्या-सुक्या कचऱ्याची घाटी परिसरात खड्ड्यांमध्ये विल्हेवाट लावली जात आहे. हा कचरा शवविच्छेदनगृहाच्या परिसरात गोळा केला जात आहे. याठिकाणी वैद्यकीय घनकचरा येता कामा नये. परंतु आजघडीला येथे लाल आणि पिवळ्या रंगाच्या पिशव्या पडून असल्याचे पाहायला मिळते.
घाटीत शवविच्छेदनगृहात लाल आणि पिवळ्या रंगाच्या पिशव्यांजवळ दोन ते तीन मोकाट कुत्र्यांच्या तोंडात मांसाचे गोळे काहींच्या निदर्शनास आले. त्यांनी कुत्र्यांवर पाळत ठेवली तेव्हा हे कुत्रे कचºयाच्या पिशव्यांभोवती फिरत असल्याचे निदर्शानास आले. त्यामुळे वैद्यकीय घनकचरा उघड्यावर फेकण्यातून हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घनकचरा उघड्यावर नाही
वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, काळ्या रंगाच्या पिशव्या अपुºया पडत असल्याने लाल आणि पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये ओला-सुका कचरा गोळा केला जातो. एका कंपनीतर्फे वैद्यकीय घनकचरा गोळा केला जातो. त्यामुळे उघड्यावर येत नाही. मोकाट कुत्र्यांच्या तोंडी नेमके काय होते, हे सांगता येणार नाही.