गॅरेजचालकाच्या मुलाने दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपटीने वाढवली; फाईल केले पेटंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:14 PM2019-07-08T17:14:09+5:302019-07-08T17:19:53+5:30
तंत्रज्ञानाद्वारे दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपट वाढविली
- राम शिनगारे
औरंगाबाद : ग्रामीण भागात दुचाकीच्या कमी प्रकाशामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर सतत प्रयोग करून तेजस संजय ढोबळे या गॅरेजचालकाच्या मुलाने संशोधन केले आहे. डायोडचे स्वतंत्र सर्किट तयार करून दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता तब्बल सातपट वाढविण्यात यश मिळविले आहे. यासाठी केवळ सात रुपये खर्च येणार आहे. या संशोधनाचे पेटंट मिळविण्यासाठी मुंबईच्या पेटंट कार्यालयात फाईल झाले आहे.
वैजापूर येथील लाडगाव रोडवर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असलेल्या संजय ढोबळे यांचा मुलगा तेजस हा रोटेगाव येथील एमआयटी तंत्रनिकेतन महाविद्यालयात दोन वर्षांपासून पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच वडिलांना गॅरेजमध्ये मदत करीत आहे. दोन वर्षांपूर्वी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या दुचाकीचा प्रकाश कमी होत असल्याच्या तक्रारी होत्या. यावर उपाय शोधण्यासाठी तेजसने प्रयत्न सुरू केले. स्वत:च्या दुचाकीवर प्रयोग करताना
दोन डायोडच्या साह्याने तयार केलेले कीट कॅथाडे साईडला जोडले. याठिकाणी स्वतंत्र सर्किट तयार केले. त्याचे कनेक्शन हँडलला दिले. हेड लाईटला असणारे न्यूट्रल वायर कट करून तयार झालेल्या सर्किटच्या ठिकाणी स्विच लावले. या स्विचवरच लाईट चालू बंद करता येऊ लागला. डायोडचा वापर केल्यामुळे दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता पूर्वीपेक्षा तब्बल सातपटीने वाढली. हा प्रयोग करताना सुरुवातीला एक डायोडचा वापर केला. पुन्हा तीन डायोड वापरले. मात्र, त्यामुळे गाडीची सर्व वायरिंग जळून गेली. त्यानंतर दोन डायोड वापरले. सुरुवातीला स्वत:च्या दुचाकीवर हे प्रयोग करण्यात येत होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर चुलतभावाच्या दुचाकीवर प्रयोग केला. त्यानंतर इतर नातेवाईकांच्या आणि नंतर दुरुस्तीसाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या दुचाकीवर हा प्रयोग करण्यात आला. बाजारात असलेल्या दुचाकीच्या हेडलाईट सरासरी १६ हजार ५०० लक्ष एकक असते. मात्र, या प्रयोगानंतर याच दुचाकीची हेडलाईट १ लाख १३ हजार लक्ष एवढी वाढत आहे.
टक्केवारीमध्ये हे प्रमाण ६.८५ टक्के एवढे अधिक असल्याचे तेजस सांगतो. या प्रयोगाची माहिती शिक्षकांनी एमआयटीचे अध्यक्ष डॉ. यज्ञवीर कवडे यांना दिली. तेव्हा त्यांनी औरंगाबाद एमआयटी महाविद्यालयातील डॉ. बी. एन. क्षीरसागर यांच्याकडे पाठविले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीष शर्मा यांची या विद्यार्थ्याने भेट घेतली. यानंतर प्रा. शर्मा यांनी संस्थेतर्फे या संशोधनाला पेटंट मिळविण्यासाठी पहिला आराखडा २०१८ मध्ये मुंबई येथील पेटंट कार्यालयाला सादर केला. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर संशोधनाची सविस्तर माहिती आणि स्ट्रक्चर मार्च २०१९ मध्ये पाठविण्यात आले आहे. पेटंट कार्यालयाने ते दाखल करून घेत पेटंट देण्याविषयीची कार्यवाही सुरू केली आहे.
३०० दुचाकींना बसविले नवीन तंत्रज्ञान
दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता डायोडच्या साह्याने कमी खर्चात वाढविता येत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तेजसच्या गॅरेजवर आतापर्यंत ३०० दुचाकींना नवीन तंत्रज्ञान बसवून दिले आहे. यासाठी तेजसला ७ रुपये खर्च येतो. मात्र, त्याच्या गॅरेजमध्ये यासाठी दोनशे रुपये शुल्क आकारले जात आहे. हे तंत्रज्ञान बसविल्यानंतर आतापर्यंत एकाही चालकाची तक्रार आलेली नाही, असेही त्याने सांगितले.
१२ लाखांत मागितले
संशोधन तेजसने स्वत: केलेले संशोधन शिक्षकाला सांगितले. शिक्षकाने नावीन्यपूर्ण संशोधन वाटल्यामुळे एका दुचाकी कंपनीचा मित्र असलेल्या मॅनेजरशी तेजसची भेट घालून दिली. मॅनेजरने सुरुवातीला ८ लाख रुपयांच्या मोबदल्यात संशोधन देण्याची मागणी केली. यानंतर १२ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. ही माहिती तेजसने वडील आणि शिक्षकांना दिली. तेव्हा त्यांनी मॅनेजरला विचारपूस केली असता, त्याने घुमजाव केले. यानंतर डॉ. कवडे यांना ही माहिती सांगितल्यानंतर एमआयटी संस्थेतर्फे तेजस ढोबळे याच्या नावावर पेटंट फाईल केले आहे.