पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:51+5:302021-03-14T04:04:51+5:30
औरंगाबाद : कला, वाणिज्य, विज्ञान या परंपरागत अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्ष पदवी परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ...
औरंगाबाद : कला, वाणिज्य, विज्ञान या परंपरागत अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्ष पदवी परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी १ लाख ४० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये होणारी ही परीक्षा मार्च २०२१ मध्ये घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे निकाल उशिरा लागल्यामुळे प्रथम वर्षाचे प्रवेशही उशिरा झाले. त्यांचा पहिल्या सत्राचा अभ्याक्रम अद्याप पूर्ण झालेला नाही.
त्यामुळे प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसोबत एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहेत, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात होतील, असे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.
तथापि, १६ मार्चपासून होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यापीठात ‘स्ट्राँग रूम’ स्थापना केली असून तेथून पेपरच्या काहीवेळ अगोदर ऑनलाइन पेपर अपलोड केले जातील. जे विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. त्यांना त्यांचे महाविद्यालय परीक्षा केंद्र (होम सेंटर) असून विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत २६० महाविद्यालयांची परीक्षा केंद्रांसाठी निवड केली आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रती महाविद्यालय २ याप्रमाणे ‘आयटी कोऑर्डिनेटर’ नेमण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय विद्यापीठात २० ‘आयटी कोऑर्डिनेटर’ नियुक्त केले असून महाविद्यालये किंवा विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी ते तत्काळ सोडवतील. विशेष म्हणजे, सध्या औरंगाबाद शहरामध्ये ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर शनिवार व
रविवारी कोणत्याही पेपरचे आयोजन करण्यात आलेले नाही.
चौकट..............
विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीद्वारे देता येईल परीक्षा
दररोज दोन सत्रांत ही परीक्षा होईल. सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत, असे परीक्षेचे सत्र असेल. हा कालावधी केवळ काही तांत्रिक अडचणी येतील या उद्देशाने देण्यात आला असून विद्यार्थ्यांना मात्र, परीक्षेसाठी फक्त एकाच तासाचा अवधी राहील. ऑफलाइन परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात एक तास व दुपारच्या सत्रात एक तास याप्रमाणे सकाळी ११ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ४ ही वेळ राहील. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन, यापैकी एकच पद्धत निवडायची आहे. दोन्ही पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही.