राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेज; गिरीश महाजनांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 12:32 PM2023-04-08T12:32:24+5:302023-04-08T12:34:19+5:30
याबरोबर प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बीएस्सी. नर्सिंग काॅलेज केले जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टरांच्या संख्यावाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जात असून, त्याची तयारी झाली आहे. आगामी ६ महिन्यांत मेडिकल महाविद्यालयाच्या बांधकामाची सुरुवात होईल. परभणी, धाराशिवसह प्रत्येक जिल्ह्यांत पुढील वर्षात वैद्यकीय महाविद्यालय आणि बॅचेस सुरू होतील, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्रीगिरीश महाजन म्हणाले. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अवयवदान जनजागृती अभियाना’चे उद्घाटन शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ. मिर्झा शिराझ बेग, डॉ. काशीनाथ गर्कळ, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. मंगला बोरकर,‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डाॅ. रवींद्र कुटे, डाॅ. उज्ज्वला दहिफळे, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, बापू घडामोडे, बसवराज मंगरुळे आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे प्रारंभी जिल्हा रुग्णालयातून त्याची सुरुवात होईल. याबरोबर प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बीएस्सी. नर्सिंग काॅलेज केले जाणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विविध १५ हजार पदे आगामी दोन महिन्यांत भरली जातील.
बटन दाबताच दिसेल शिल्लक बेड
धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत जी रुग्णालय आहेत, ती विविध सवलती घेतात. त्यांनी १० टक्के बेड हे गोरगरीब रुग्णांसाठी ठेवले पाहिजे. परंतु गोरगरिबांना बेड मिळत नाही. बेड भरलेले दाखवितात. अनेक तक्रारी आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवस्था करीत आहोत. बटन दाबले की, रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, हे कळेल. महिनाभरात ही सुविधा सुरू होईल, असे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हिप रिप्लेसमेंट, हार्निया, अपेंडिक्स जनआरोग्य योजनेत
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत अनेक आजार आहेत. परंतु त्यात असेही आजार आहेत, त्याचा लाभ एकाही रुग्णाला घेता येत नाही. ही संख्या कमी करून हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेट, हार्निया, अपेंडिक्स आदी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे, असेही महाजन म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर, लातूरचे सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल ‘पीपीपी’वर
घाटीत सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल उभारण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथील सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्यासंदर्भात टेंडर निघाले आहे. या महिन्यात त्याचा निर्णय होईल आणि ते कार्यान्वित होईल. गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळेल. श्रीमंत लोक एमआरआय, सीटी स्कॅन आदी सेवा, उपचार घेऊ शकतील. गोरगरिबांची सुश्रूषा होईल. मागच्या सरकारचे धोरण माहीत नाही. परंतु हे रुग्णालय लवकर व्हावे, गरिबांना उपचार मिळावे, हाच हेतू असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
..या जागा भरणार
महाजन म्हणाले, ‘एनएमसी’च्या मानकांनुसार निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १,४३२ पदे निर्माण करण्यात आली. ‘एमपीएससी’मधून शिफारस प्राप्त अध्यापकांची ७७८ पदांची तीन महिन्यांची मुलाखती घेऊन रुजू करून घेतले. ‘गट-क’ची ४५०० पदे ‘टाटा कन्सलटेशन’ला परवानगी दिली आहेत. महिनाभरात ही पदे भरली जातील. ‘गट-ड’ची ३८७४ पदे ही जिल्हा निवड समितीमार्फत भरली जाणार आहे. तीदेखील महिनाभरात भरली जातील. तर ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ या संवर्गातील ५,०५६ पदे बाह्यस्त्रोताने भरली जातील. जवळपास दोन महिन्याभरात या १५ हजार जागा भरल्या जातील आणि प्रश्न निकाली, अडचणी निकाली निघतील.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
पत्रकार परिषदेत गिरीश महाजन म्हणाले, हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंची सेना यांचा काहीही संबंध राहिलेला नाही. खुर्चीसाठी ते कोणाशीही तडजोड करतील, युती करतील. ‘एमआयएम’सोबत गेले तरी कुणाला आश्चर्य वाटायला नको.