कामगारांना ३ कोटींची वैद्यकीय प्रतिपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:02 AM2021-01-13T04:02:06+5:302021-01-13T04:02:06+5:30
औरंगाबाद : राज्य कामगार विमा योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात ११८९ कामगारांना तब्बल २ कोटी ९३ लाख ८५ हजार रुपयांची वैद्यकीय ...
औरंगाबाद : राज्य कामगार विमा योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात ११८९ कामगारांना तब्बल २ कोटी ९३ लाख ८५ हजार रुपयांची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करण्यात आली. विशेष म्हणजे यात एका रुग्णाचे १८ लाख ७१ हजार रुपयांचे वैद्यकीय बिलही मंजूर झाले.
उद्योगांमधील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी सरकार विमा रुग्णालय चालविते. त्या बदल्यात कामगारांच्या वेतनातून अग्रीम रक्कम कपात केली जाते. ज्या कामगारांना विमा रुग्णालयाखेरीज अतिविशेषोपचारांची गरज असते, अशा रुग्णांना खासगीत रेफरही केले जाते. त्यानंतर उपचारावरच्या खर्चाचा परतावा सरकार अदा करते. चिकलठाणा एमआयडीसीत १०० खाटांचे राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा कामगारांना मोठा आधार मिळत आहे. या रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या सुविधांत वाढ होत आहे. शिवाय तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी जो ‘ईएसआयएस’ रुग्णालय सोडून अन्य खासगी रुग्णालयातून वैद्यकीय सेवा घेतो, त्याला त्याच्या उपचाराची प्रतिपूर्ती म्हणजेच खर्च दिला जातो. गेल्या वर्षभरात अशा प्रकारे ११८९ प्रकरणात जवळपास ३ कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली. यात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या एका रुग्णाचे १८ लाख ७१ हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. आयुक्त, संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
आणखी ७७ लाखांची लवकरच प्रतिपूर्ती
वर्षभरात जवळपास ३ कोटी रुपयांचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. यात एका रुग्णाला १८ लाख ७१ हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. आणखी ७७ लाख रुपयांची प्रतिपूर्ती लवकरच होणार आहे.
- डॉ. विवेक भोसले, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, चिकलठाणा.