नांदेडच्या मेडिकल चालकांकडून नशेच्या गोळ्यांचा छत्रपती संभाजीनगरात पुरवठा, दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:31 PM2024-08-23T13:31:58+5:302024-08-23T13:33:14+5:30

दीड हजार रुपयांपर्यंत पोहोचला दहा गोळ्यांचा दर, सहा दिवसाला तस्करी

Medical drivers of Nanded supply drug pills to Chhatrapati Sambhajinagar, two arrested | नांदेडच्या मेडिकल चालकांकडून नशेच्या गोळ्यांचा छत्रपती संभाजीनगरात पुरवठा, दोघे अटकेत

नांदेडच्या मेडिकल चालकांकडून नशेच्या गोळ्यांचा छत्रपती संभाजीनगरात पुरवठा, दोघे अटकेत

छत्रपती संभाजीनगर : नांदेडच्या मेडिकल व्यावसायिकांकडून शहरात नशेच्या गोळ्यांचा पुरवठा होत आहे. बुधवारी एनडीपीएस पथकाने दोन एजंटला अटक केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. गफुर खान उर्फ बाबा करीम खान (३७) व शेख अकबर उर्फ बादशाह शेख पाशा (३०, दोघे रा. कैसर कॉलनी) अशी संशयिताची नावे असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

निरीक्षक गीता बागवडे यांना दोघांच्या गोळ्यांच्या विक्रीबाबत माहिती मिळाली होती. सायंकाळी ५ वाजता उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह त्यांनी रवींद्र कॉलनीच्या जवळ मोकळ्या मैदानावर सापळा रचला होता. बाबा करीम हातात पिशवी घेऊन जाताना दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने शेख अकबर त्याला विक्रीसाठी नियमित गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे सांगितले. अंमलदार लालखान पठाण, सतीश जाधव, संदिपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, छाया लांडगे यांनी त्याला घरातून अटक केली. बाबाच्या ताब्यातून पथकाने ९०० गोळ्या जप्त केल्या.

नांदेडचा गोविंद शेठ कोण ?
अकबरने तो नांदेडचा मेडिकल चालक गोविंद शेठकडून गोळ्या विकत आणत असल्याची कबुली दिली. गोविंदसारखे तीन ते चार मेडिकल चालक शहरात नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचेही त्याने सांगितले. जवळपास सहा ते सात दिवसाला तो रेल्वेने नांदेडवरून गोळ्या आणतो.

पोलिसांच्या सहानुभूतीचा प्रयत्न
अकबर व गफुरने पहिले पोलिसांना टिप देऊन त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. नशेच्या गोळ्यांची मागणी करणाऱ्यालाच विक्रेता सांगून पोलिसांना त्याची टिप द्यायची व सहानुभूती मिळवून स्वत:ची विक्री सुरू ठेवण्याचा दोघांचा प्रयत्न होता. मात्र, पथकाने दोघांनाच रंगेहाथ पकडून थेट तुरुंगापर्यंत नेले.

 

Web Title: Medical drivers of Nanded supply drug pills to Chhatrapati Sambhajinagar, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.