वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:19 AM2017-10-16T01:19:04+5:302017-10-16T01:19:04+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशात प्रत्येक मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. त्यामुळे २०२५ पर्यंत हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न आहेत. नव्या औषधोपचारांनी त्यात निश्चित यश येईल, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या तीनदिवसीय परिषदेचा रविवारी (दि.१५) समारोप झाला. परिषदेत आयोजित चर्चासत्रात डॉ. संजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी व्यासपीठावर इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, संयोजन अध्यक्ष डॉ. अजित दामले, संयोजन सचिव डॉ. ज्योती इरावणे (बजाज), डॉ. वीरेंद्र काशेट्टी, डॉ. छाया कुमार, डॉ. जयश्री भाकरे यांची उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी यांनी देशातील क्षयरोगाच्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन केले. प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. डॉ. रंजनी रामचंद्रन यांनी सध्याच्या आणि भविष्यातील क्षयरोग निदानाच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. श्रीपाद टाकळीकर यांनी ‘आॅटोमेशन इन मायक्रोबायोलॉजी’ या विषयी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत राज्यभरातील जवळपास २८० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ़ अनिल गायकवाड, डॉ़ मंगला हरबडे, डॉ़ मुक्ता खापरखुंटीकर, डॉ़ लईक जाफरी, डॉ़ अर्जुन जाधव, डॉ़ अनुजा सामाले आदींनी परिश्रम घेतले.