औषधी गोळ्यांचा मूळ दर ६५ रुपये, विक्री १२०० रुपयांत; एका गोळीची ४८ तास नशा
By सुमित डोळे | Updated: December 16, 2023 13:00 IST2023-12-16T12:58:15+5:302023-12-16T13:00:01+5:30
नशेखोरांना चोरट्या मार्गाने एजंटकडून १२०० रुपयांत विक्री होते गोळी

औषधी गोळ्यांचा मूळ दर ६५ रुपये, विक्री १२०० रुपयांत; एका गोळीची ४८ तास नशा
छत्रपती संभाजीनगर : मानसिक रोगासाठी, जळालेल्या रुग्णांच्या उपचारांवर डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या औषधांचा शहरात सर्रास नशेसाठी वापर केला जात आहे. जिन्सी पोलिसांनी गुरुवारी या रॅकेटमधील तिघांना अटक केली. मोहम्मद दादामिया पठाण असे विकणाऱ्याचे नाव असून, इमरान कबीर बातुक (३३, रा. किराडपुरा) व सलमान खान आरेफ खान (२१, रा. बायजीपुरा) हे विकत घेण्यासाठी आले होते.
पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील नशेखोरीवर सक्तीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी त्यानुसार सापळा रचला होता. गुरुवारी खबऱ्याने त्यांना मोहम्मद दोन तरुणांना गजीबो हॉटेलच्या गल्लीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. औषध निरीक्षक बी. डी. मरेवाड यांना सोबत घेत गांगुर्डे यांनी सापळा रचला. इमरान व सलमान दोघेही गोळ्यांसाठी वाट पाहत होते. मोहम्मद ने येऊन त्यांना गोळ्या सुपूर्द करताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यात एकूण ११० गोळ्या आढळून आल्या. त्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
दामदुपटीने विक्री, एका गोळीची ४८ तास नशा
तरुणांना सुरुवातीला व्यसन लागेपर्यंत एजंटकडून माफक दरात गोळ्यांची विक्री केली जाते. त्याचे व्यसन लागून संबंधित तरुण नशेला आहारी जाताच मग दर वाढवून विक्री होते. बऱ्याचदा स्टॉकच नाही, असे सांगून एका स्ट्रिपचा ६५ ते ८० रुपयांपर्यंत मूळ दर असलेल्या या गोळ्यांची विक्री १ हजार ते १२०० रुपयांना केली जाते. याचे मूळ विक्रेते मात्र पोलिसांना मिळून येत नाही.