औषधांचा उत्तराखंडमध्ये ‘खेळ’, तरीही औषधे पोहोचतात सहज

By संतोष हिरेमठ | Updated: December 16, 2024 07:39 IST2024-12-16T07:38:28+5:302024-12-16T07:39:31+5:30

देशातील २० टक्के औषधांची निर्मिती उत्तराखंडमध्ये

medicine game in uttarakhand yet medicines reach easily | औषधांचा उत्तराखंडमध्ये ‘खेळ’, तरीही औषधे पोहोचतात सहज

औषधांचा उत्तराखंडमध्ये ‘खेळ’, तरीही औषधे पोहोचतात सहज

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : उत्तराखंडमध्ये औषध निर्मितीचे मोठे ‘हब’ आहे. मात्र, याच हबमध्ये बनावट औषधींचे उत्पादन करून देशभरात त्याचा पुरवठा करण्याचा जीवघेणा उद्योग सुरू आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या ४ वर्षांत बनावट औषधींचे अनेक प्रकार समोर आले. परंतु, ही औषधी सहजपणे येतात. 

अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बनावट औषधी पुरवठा करण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बनावट औषधी उत्पादनाच्या घोळात   मरिस्टल फाॅर्म्युलेशन उत्तराखंड, रिफंड फार्मा केरळ, बायोटेक फाॅर्म्युलेशन आंध्र प्रदेश, मेलवान बायो सायन्सेस केरळ, एसएमएन लॅब उत्तराखंड हे पाच उत्पादक ‘रडार’वर आले. उत्तराखंडमध्ये सुमारे २८३ फार्मा कंपनी आहेत. १२० काॅस्मेटिक प्रॉडक्ट्स कंपन्या आहेत. यात डेहराडून, हरिद्वार, पंतनगर मोठे ‘हब’ आहेत. देशातील एकूण उत्पादनातील २० टक्के औषधी ही उत्तराखंडमध्ये बनते.   

२०२० मध्ये पकडली दीड कोटींची बनावट औषधे 

उत्तराखंडमधील गंगनहर पोलिसांनी रामनगर औद्योगिक वसाहतींमधील एका औषध कंपनीवर छापा टाकून दीड कोटींची बनावट औषधी पकडली होती. तसेच ७ लोकांना ताब्यात घेतले हाेते. मे २०२१ मध्ये रेमेडिसिव्हिरचे नकली इंजेक्शनही इथे पकडण्यात आले. उत्तराखंडमधील रुडकी येथे जून २०२२ मध्ये ५ गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषधी सापडली. 

नोव्हेंबर २०२२ मध्ये ११  औषधी ‘फेल’

नोव्हेंबर २०२२ मध्ये देशभरातील औषध नमुने तपासणीचा अहवाल समोर आला. यात उत्तराखंडमध्ये तयार होणाऱ्या ११ औषधे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या निकषात बसत नसल्याचे दिसून आले.

शहरात उत्तराखंडचा औषधपुरवठा

रुग्णालयांमध्ये उत्तराखंडमधीलच अन्य उत्पादक कंपन्यांची औषधे आहेत. उत्तराखंडमधील कंपन्यांच्या औषधांविषयीही आता शंका उपस्थित होत आहे. प्रत्येक औषधांबाबत खबरदारी गरजेची असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. 

 

Web Title: medicine game in uttarakhand yet medicines reach easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं