औषधी महागणार? नवा स्टाॅक येताच होईल स्पष्ट
By संतोष हिरेमठ | Published: April 3, 2024 05:43 PM2024-04-03T17:43:16+5:302024-04-03T17:43:22+5:30
१५ दिवसांची प्रतीक्षा : जिल्ह्यातील रुग्णांना सध्यातरी दिलासा
छत्रपती संभाजीनगर : वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकानुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ॲण्टिबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. शहरात औषधींचा नवा स्टाॅक आल्यानंतरच कोणती औषधी महाग झाली, कोणती स्वस्त झाली, हे स्पष्ट होणार आहे.
घाऊक किंमत निर्देशांकामध्ये अनेक बदल केल्याने आता अनेक औषधांच्या किमती वाढणार आहेत. देशात ८००हून अधिक औषधे महाग होणार आहे. औषधींच्या किमती १२ टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु कोणत्या औषधी किती महागल्या, हे काही दिवसांनंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.
ही औषधी महागण्याची शक्यता
पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन गोळ्या, स्टिरॉइड्स, पेनकिलर, टीबी, कॅन्सर, मलेरिया, एचआयव्ही- एड्स, ॲण्टिबायोटिक्स, ॲण्टि-डोट्स, ॲनिमिया, डिमेंशिया औषधे, बुरशीविरोधी औषधे, हृदयविकाराची औषधे, त्वचारोग संबंधित औषधे, प्लाझ्मा, जंतुनाशक औषधे इ. औषधी महागणार असल्याचे सांगण्यात येते.
ऐकण्यात आले; पण कंपन्यांकडून लेखी नाही
औषधीच्या किमती वाढणार असल्याचे ऐकण्यात आले आहे. मात्र, कंपन्यांकडून अजून काही लेखी आलेले नाही. सध्या सर्दी, खोकल्याने आजारी पडल्यानंतर उपचारासाठी किमान एक हजार रुपये खर्च येतो. औषधींवरील ‘जीएसटी’ कमी करण्याची गरज आहे.
- अनिल महाजन, युनिट सचिव, महाराष्ट्र सेल्स ॲण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन
संघटनेपर्यंत काही माहिती नाही
औषधांच्या किमती वाढीसंदर्भात अद्यापपर्यंत संघटनेला कोणतीही माहिती मिळालेली नाही. किमती वाढीसंदर्भात ई-मेलही आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी औषधींच्या किमती वाढणार नाहीत.
- नितीन देशमुख, अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
नवीन माल आल्यावर स्पष्ट होईल
औषधींचा नवीन माल येण्यास किमान १५ दिवस लागतील. त्यानंतरच किमती वाढल्या की नाही, हे स्पष्ट होईल. प्रत्येक औषधीच्या किमती वाढतातच, असे नाही. काही औषधींच्या किमती कमीही होतात.
- विनोद लोहाडे, औषध विक्रेता