शिवसेना नेते दिल्लीला गेल्याने फेरबदल,पराभवाच्या चिंतनाला खो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 04:21 PM2019-06-15T16:21:57+5:302019-06-15T16:25:01+5:30
बैठक शेतकरी संपर्क अभियानावर चर्चा करून गुंडाळण्यात आली.
औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना संघटनेत फेरबदल आणि लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चिंतन करण्यासाठी शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीत दोन्ही विषयांना ‘खो’ देण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दिल्लीत असल्यामुळे शिवसेना भवन येथे झालेल्या त्या बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पराभव चिंतन आणि फेरबदलाची बैठक शेतकरी संपर्क अभियानावर चर्चा करून गुंडाळण्यात आली.
१४ जून रोजी शिवसेना भवन, मुंबईत संपर्क नेते आणि जिल्हाप्रमुखांची आढावा बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद लोकसभा पराभव आणि फेरबदलाबाबत काहीही चर्चा झाली नसून, याबाबत चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पराभवाला पक्षातील काही पदाधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना, युवासेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली आहे; परंतु फेरबदल करून काय साध्य होणार, विधानसभा निवडणुकीसाठी साम, दाम, दंड,भेद, अशी जबाबदारी घेणारी बी-टीम आहे काय? याबाबत पक्ष चाचपणी करीत आहे. तशी टीम सापडली तरच फेरबदल करण्यावर शिक्कामोर्तब होईल. शिवसेना नेते खैरे यांनी फेरबदलासाठी त्या पद्धतीनेच यादी तयार केल्याची चर्चा आहे. शहरप्रमुख, शहर उपप्रमुख, जिल्हा उपप्रमुखांतील फेरबदल स्थानिक पातळीवर होतील, तर जिल्हाप्रमुख बदलण्यासाठी मातोश्रीवर चिंतन बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी तर पक्षातील अनेक हौशै-नवशे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या
शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे लक्ष देण्याबाबत शुक्रवारच्या बैठकीत जिल्हाप्रमुखांना सूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडे जा, त्यांना पीक विमा, दुष्काळी अनुदानाबाबत काही अडचणी असतील, तर मार्गदर्शन केंद्र सुरू करा. गावागावांमध्ये केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखांना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणूक पराभव अनुषंगाने आयोजित बैठक पुढे ढकलण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.