‘मातोश्री’ वर मंगळवारी बैठक
By Admin | Published: September 11, 2016 01:06 AM2016-09-11T01:06:11+5:302016-09-11T01:24:12+5:30
औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पदावरून नव्हे तर पक्षातूनच हाकलून लावा, अशी मागणी सेनेतील एका गटाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करून जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली.
औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पदावरून नव्हे तर पक्षातूनच हाकलून लावा, अशी मागणी सेनेतील एका गटाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करून जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली. सेनेमध्ये आता उघडपणे दोन गट पडले असून, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताच ‘मातोश्री’ने याची तातडीने दखल घेतली. दानवे हटावचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे.
जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मागील काही दिवसांमध्ये चक्क पक्ष विकायला काढला असून, त्यांची पदावरून आणि पक्षातूनच हकालपट्टी करा, अशी मागणी आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, मुन्ना त्रिवेदी, अण्णासाहेब माने, माजी महापौर विकास जैन आदींनी दानवे यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटले. शिवसेनेत यापूर्वी कधीही आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली नाही. एकमेव दानवे यांच्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून पत्रकार परिषद घेतली. शनिवारी शहरातील सर्वच स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये दानवे हटावच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. सेनेतील अंतर्गत भडक्याची ठिणगी मुंबईपर्यंत पोहोचली.
संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दूरध्वनीवर स्थानिक हालचालींचा आढावा घेतला. मंगळवारी सकाळी ११ वाजता मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आ. संजय शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी बैठकीसंदर्भात आपल्याला अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मुंबईहून बैठकीचे निमंत्रणही नसल्याचे नमूद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत संतुष्ट व असंतुष्ट गटाला पक्षनेते समोरासमोर बसवून गाऱ्हाणे ऐकणार आहेत. त्यानंतर बंद खोलीत दानवे हटावचा निर्णय घेण्यात येणार आहे.