विद्यापीठ कायद्यासंदर्भात आमदारांची बैठक
By Admin | Published: May 30, 2016 12:55 AM2016-05-30T00:55:26+5:302016-05-30T01:13:56+5:30
औरंगाबाद : नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र नागरी विद्यापीठ कायद्यासंदर्भात नेमलेल्या आमदारांच्या समितीची ३१ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे.
औरंगाबाद : नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र नागरी विद्यापीठ कायद्यासंदर्भात नेमलेल्या आमदारांच्या समितीची ३१ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. प्रस्तावित कायद्यातील काही तरतुदींना आमदारांचा आक्षेप असून, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
मार्च २०१६ मध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक मांडण्यात आले. मात्र, अनेक आमदारांनी विधेयकातील तरतुदींना विधान परिषदेत विरोध केला होता. विधान परिषदेत सत्तारूढ भाजप- शिवसेनेचे बहुमत नाही. त्यामुळे या कायद्यातील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या आमदारांची एक समिती नेमण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार या आमदारांची ३१ मे रोजी विधेयकातील तरतुदींसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. मुख्यत: कुलगुरूंना जादा अधिकार देण्यास विरोधी पक्षातील आमदारांचा आक्षेप आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील नियुक्त्यांनाही आमदारांचा विरोध आहे. या तरतुदीला शिवसेनेच्या आमदारांचाही विरोध असल्याची माहिती आहे. नियुक्त्यांच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींचे बस्तान बसविण्याचा प्रयत्न भाजप करील, असे विरोधी पक्षातील आमदारांना वाटत आहे. त्यामुळे यासंदर्भातील तरतुदींवर चर्चा होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.