एल्गार सभेसाठी सुकाणू समितीची बैठक
By Admin | Published: July 9, 2017 12:25 AM2017-07-09T00:25:12+5:302017-07-09T00:30:17+5:30
नांदेड : कर्जमाफीसंबंधी जाचक अटींच्या शासन निर्णयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कर्जमाफीसंबंधी जाचक अटींच्या शासन निर्णयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली़ शेतकरी आंदोलनाचा राज्य सरकारने विश्वासघात केल्याचा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आरोप केला़ जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या एल्गार सभेसाठी नियोजन करण्यात आले़
विविध शेतकरी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक ७ जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडली़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे हे होते.
महाराष्ट्राच्या शेतकरी सुकाणू समितीच्या निर्णयानुसार ९ ते २४ जुलै पर्यंत राज्यभर एल्गार सभा जिल्हास्तरावर घेण्याचे ठरले. १८ जुलै रोजी नांदेड येथे राज्य सुकाणू समितीचा दौरा येणार असून त्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. अर्जुन आडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत पुढील कार्यक्रमाचे नियोजन ठरले.
१८ जुलै रोजी किनवट येथे जाहीर मेळावा घेण्याचे ठरले. तर नांदेड शहरातील मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी ९ जुलै रोजी बैठक होईल. बैठकीस सर्व संघटनांच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक कॉ. अर्जुन आडे यांनी केले़
बैठकीस विशेषत्वाने किसान सभेचे कॉ. अर्जुन आडे, शेकाप किसान आघाडीचे भाई दत्ता कुरूडे, भाई राजेश ढवळे, शेतकरी संघटनेचे शिवाजी कराळे, आदिवासी शेतकरी राष्ट्रीय अधिकार मंचचे शंकर सिडाम, म. रा. शेतमजूर युनियनचे कॉ. विनोद गोविंदवार, शेतकरी संघर्ष सभेचे किशोर पवार, एसएफआय विद्यार्थी संघटनेचे राज्य सचिव बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विकास वाठोरे, सीआयटीयूचे कॉ. विजय गाभणे, किसान संघर्ष मोचार्चे शिवाजी गायकवाड, देवस्थान शेतकरी बचाव आंदोलनाचे मनोज कीर्तने, डीवायएफआयचे जनार्दन काळे, भोई संघटनेचे नानासाहेब लकाटे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन कॉ. विनोद गोविंदवार यांनी केले. कॉ. बालाजी कलेटवाड यांनी आभार मानले.