सुसंवादाच्या बैठकीत प्रश्नांचा भडिमार
By Admin | Published: September 20, 2014 12:19 AM2014-09-20T00:19:41+5:302014-09-20T00:28:53+5:30
औरंगाबाद : बैठकीत कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसोबत सुसंवाद साधण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १५ दिवसांतच विद्यापीठातील सर्व शिक्षकांची बैठक घेऊन सुसंवाद साधला. त्यानंतर काही दिवसांतच सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ते कर्मचाऱ्यांकडे सहकार्याचे आवाहन करणार होते; पण येनकेन प्रकारेण ती बैठक होऊ शकली नव्हती. दोन दिवसांपूर्वीच या बैठकीचे त्यांनी नियोजन केले. काल मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची सुटी असल्यामुळे गुरुवारी ही बैठक आयोजित केली. या बैठकीस प्रामुख्याने कुलगुरू डॉ. चोपडे यांच्यासोबत कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर, निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. किशन धाबे, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका डॉ. चेतना सोनकांबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या बैठकीस मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. चोपडे यांनी आवाहन केले की, शिक्षक आणि कर्मचारी हे विद्यापीठाच्या रथाची दोन चाके आहेत. या दोघांच्या सहकार्यातून विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकते. गरज आहे ती ड्यूटीवर वेळेवर येण्याची, विद्यापीठात सकाळी आल्यानंतर प्रामाणिकपणे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम करण्याची. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात, यावर आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर कुलसचिव डॉ. माने यांनीही कर्मचाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर मात्र, विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे नेते नितीन गायकवाड, उपकुलसचिव डॉ. नेटके यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा व प्रशासनाकडून होत असलेल्या असहकाराचा पाढाच वाचला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेची भावना आहे. दबावाचे प्रकार वाढल्यामुळे कर्मचारी व्यवस्थित काम करू शकत नाहीत. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी गाऱ्हाणी मांडण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले, तर संजय शिंदे यांनी आभार मानले.