वाहनचालकांच्या खिशाला कात्री; थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागला, तुम्हाला फटका कितीचा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:57 PM2022-06-07T18:57:10+5:302022-06-07T18:57:58+5:30
अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यासाठी महत्त्वपूर्ण
औरंगाबाद : सर्व वाहनांना थर्ड पार्टी विमा असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा विमा काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरते. या सगळ्यात आता वाहनांचा थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
थर्ड पार्टी विमा म्हणजे यात पहिला पक्ष हा वाहन मालक असतो. दुसरा पक्ष हा वाहन चालक आणि अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्ती तिसरा पक्ष समजला जातो. अपघातग्रस्तास नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी ही वाहन मालकावर असते. थर्ड पार्टी विमा काढलेला असल्यास ही भरपाई विमा कंपनी देते. १ जूनपासून थर्ड पार्टी विमा महागला आहे. मात्र, १५० सीसीपर्यंतच्या दुचाकीचा थर्ड पार्टी विमा स्वस्त झाला आहे.
ई-वाहनांना ७.५ टक्के सवलत
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या वाहनांच्या इन्शुरन्सवरील प्रीमियमवर ७.५ टक्के सवलत दिली जाईल. ३ किलोवॅट क्षमतेच्या ई-स्कूटर्ससाठी पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम २,४६६ रुपये निश्चित करण्यात आला आहे, तर ३ ते ७ किलोवॅट क्षमतेच्या ई-स्कूटर्ससाठी प्रीमियम ३,२७३ रुपये असेल. त्याचप्रमाणे ७ किलोवॅट ते १६ किलोवॅट क्षमतेच्या दुचाकींना पाच वर्षांसाठी ६,२६० रुपये प्रीमियम, तर १६ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना १२,८४९ रुपये प्रीमियम भरावा लागेल. सरकारने खाजगी ई-कारांसाठी थर्ड पार्टी विमा हप्तादेखील निश्चित केला आहे. आता ३० किलोवॅट क्षमतेच्या ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ५,५४३ रुपये असेल. त्याचप्रमाणे, ३० किलोवॅट ते ६५ किलोवॅटमधील ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ९,०४४ रुपये आकारला जाईल. ६५ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या ई-कारसाठी आता २०,९०७ रुपये तीन वर्षांचा प्रीमियम आकारला जाईल, असे विमा प्रतिनिधी अर्जुन नवगिरे यांनी सांगितले.
शहरात कोणती वाहने किती ?
दुचाकी- १२,४०,०५०
तीनचाकी-३६,२२६
चारचाकी-१,०७,२५८
डिलिव्हरी व्हॅन-३८,०९२
शहरात इलेक्ट्रिक वाहने किती ?
दुचाकी-२६३०
चारचाकी- ३०९
तीनचाकी-२६
थर्ड पार्टी विमा किती ? (विना‘जीएसटी’)
वाहनाचा प्रकार-आधी-१ जूननंतर
१ हजार सीसीपर्यंतच्या कार-२०७२-२०९४
१५०० सीपर्यंतच्या कार-३२२१-३४१६
१५०० पेक्षा सीसीच्या कार-७८९०-७८९७
१५० सीसीपर्यंतच्या दुचाकी-७५२-७१४
१५० पेक्षा जास्त सीसीच्या दुचाकी -११९३-१३६६
३५० सीसीपेक्षा जास्त सीसीच्या दुचाकी-२३२३-२८०४
विमा असणे बंधनकारक
सर्व वाहनांना थर्ड पार्टी विमा असणे बंधनकारक आहे. ई-वाहनांना नोंदणीसाठी सवलत दिली जाते.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी