‘वंचित’मध्येही मेगाभरती सुरू; राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:47 PM2019-08-03T16:47:56+5:302019-08-03T16:51:05+5:30
भाजपनंतर वंचितमध्येही मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे.
औरंगाबाद : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अलीकडेच पक्षाने काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. या नेमणुकीमुळे पक्षात नाराजांची संख्या वाढली. पक्षाचे वरिष्ठ नेते नाराजीची साधी दखलही घेत नसल्याचे लक्षात आल्यावर औरंगाबाद मध्य मतदारसंघातील अध्यक्ष तथा माजी नगरसेवक इलियास किरमाणी, माजी नगरसेवक खाजा शरफोद्दीन, नासेर चाऊस यांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाला शहरात मोठे खिंडार पडले आहे. भाजपपाठोपाठ आता वंचितमध्येही मोठी मेगाभरती सुरू झाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजप, वंचित बहुजन आघाडीला मिळालेले यश पाहून विरोधी पक्षातील नेत्यांची तगमग सुरू झाली आहे. आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा देणाऱ्या राजकीय मंडळींनी सर्व तत्त्वे गुंडाळून भाजपमध्ये प्रवेश करणे सुरू केले आहे. भाजपनंतर वंचितमध्येही मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. मुस्लिम आरक्षणासाठी राज्यात सर्वप्रथम मोर्चा काढण्याचे काम मुस्लिम अवामी कमिटीने केले होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक इलियास किरमाणी यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य मतदारसंघातील अध्यक्ष म्हणूनही काही वर्षांपासून ते कार्यरत होते. पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी काम केले. अलीकडेच पक्षात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. काही नवनिर्वाचित पदाधिकारी नेमण्यात आले. या नेमणुकीवर किरमाणी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या नाराजीची साधी दखलही पक्षाने घेतली नाही, त्यामुळे त्यांनी अचानक गुरुवारी मुंबईत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत हमालवाडा येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक खाजा शरफोद्दीन, आरेफ कॉलनीचे माजी नगरसेवक नासेर चाऊस यांनीही प्रवेश केला. खाजा शरफोद्दीन यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत.
आता लांबलचक रांग लागणार...
गुरुवारी मोजक्याच तीन जणांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी आदी अनेक पक्षांतील नेते संपर्कात आहेत.लवकरच वंचितमध्ये प्रवेशासाठी लांबलचक रांग लागणार असल्याचे खाजा शरफोद्दीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.