सभापतीच्या शर्यतीत मेघावालेंची सरशी
By Admin | Published: May 31, 2016 12:30 AM2016-05-31T00:30:29+5:302016-05-31T00:47:09+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी आपली वर्णी लागावी म्हणून शिवसेनेतील सहा नगरसेवक मागील पंधरा दिवसांपासून कंबर कसून होते.
औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी आपली वर्णी लागावी म्हणून शिवसेनेतील सहा नगरसेवक मागील पंधरा दिवसांपासून कंबर कसून होते. प्रत्येकजण आपापल्या श्रेष्ठींमार्फत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी ज्येष्ठ नगरसेवक मोहन मेघावाले यांच्या नावाची घोषणा केली. २ जून रोजी स्थायी समितीच्या निवडणुकीत आता फक्त मेघावाले यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.
यंदा स्थायी समितीमधून सेनेच्या कोट्यातून ज्योती पिंजरकर या एकमेव सदस्य निवृत्त झाल्या. त्यांच्या जागेवर वर्णी लागावी म्हणून सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन, राजू वैद्य यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. पक्षश्रेष्ठींनी सर्व ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून सीताराम सुरे यांना स्थायी समितीत पाठविले. स्थायी समितीमध्ये सेनेचे सहा सदस्य आहेत. त्यातील एकाची सभापतीपदी निवड होणार हे निश्चित आहे. प्रत्येक सदस्य उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षनेत्यांकडे वशिला लावत होता. स्थानिक नेत्यांनी काही नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविले होते. त्यामध्ये मोहन मेघावाले, गजानन मनगटे, सीताराम सुरे, मकरंद कुलकर्णी यांचा समावेश होता. मातोश्रीने मेघावाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी अधिकृत पत्र महापौर त्र्यंबक तुपे यांना सोमवारी दिले. तत्पूर्वी पालकमंत्री रामदास कदम यांनी मेघावाले यांच्या नावाची घोषणा केली.
महापालिके त शिवसेना-भाजप सत्तेत येण्यामध्ये सर्वात मोठे योगदान सिडको-हडकोचे असते. १९८८ पासून आजपर्यंत या भागाला सेना-भाजपने फारसा न्याय दिला नाही. या भागातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांना मानाची पदे देण्यात आली नाही. अनेक वर्षांनंतर स्थायी समिती सभापतीपद यंदा देण्यात आले आहे.
हडको एन-१२ परिसरातील स्वामी विवेकानंदनगर वॉर्डातून मोहन मेघावाले सतत १५ वर्षे निवडून आले. यंदा आरक्षणामुळे त्यांना वॉर्ड बदलावा लागला. रोजेबाग वॉर्डातून त्यांनी निवडणूक लढविली. एमआयएम आणि काँग्रेसच्या लढतीत ते निवडून आले. यंदा महापालिकेत सेनेच्या वाट्याला सभापतीपद आले आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना सभापतीपद देण्याचे निश्चित केले आहे. २ जून रोजी स्थायी समिती सभापतीची निवडणूक घेण्यात येणार आहे. मंगळवारपासून अर्ज वाटप होणार आहे. एमआयएम कोणाला उमेदवारी देण्यात येणार आहे, हे अजून निश्चित नाही. स्थायीमध्ये सेना- भाजप युतीला स्पष्ट बहुमत आहे. सेनेचे-६, भाजपचे-३, अपक्ष आघाडीचे -२ सदस्य आहेत. ११ मते युतीच्या पारड्यात आहेत. विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमकडे ४ आणि काँग्रेसकडे १ सदस्य आहे.