मेल्ट्रोनमध्ये चार ऑक्सिजन प्लांट बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:04 AM2021-05-08T04:04:01+5:302021-05-08T04:04:01+5:30

औरंगाबाद : नऊ महिन्यांपूर्वी महापालिकेच्या मेल्ट्रोनमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत हा प्लांट उभारण्यात ...

Meltron will have four oxygen plants | मेल्ट्रोनमध्ये चार ऑक्सिजन प्लांट बसविणार

मेल्ट्रोनमध्ये चार ऑक्सिजन प्लांट बसविणार

googlenewsNext

औरंगाबाद : नऊ महिन्यांपूर्वी महापालिकेच्या मेल्ट्रोनमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत हा प्लांट उभारण्यात प्रशासनाला अपयश आले. आता रुग्णालय परिसरात छोटे-छोटे चार ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी मनपा प्रशासनाकडून करण्यात आली. रुग्णालयातील तीनशे खाटांना कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार असल्याचा दावा मनपाने केला आहे.

कोरोनात गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. परंतु, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून रुग्णांचे नातेवाईक विविध दवाखान्यांमध्ये चकरा मारत होते. त्यामुळे महापालिकेने मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील राबविली. लिक्विड ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीतून या प्लांटच्या उभारणीसाठी साडेचार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली. जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी प्राप्त झाल्यावर प्लांटचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात आली. वर्कऑर्डर मिळाल्यानंतर कंत्राटदाराने बेसमेंटचे काम सुरू केले आणि नंतर हे काम थांबले.

दरम्यान, हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी संपर्क साधला आणि हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला. आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून हे प्लांट उभारण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील याच कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजनचे दोन प्लांट देण्याची घोषणा केली. हे प्लांटदेखील हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे असणार आहेत. लिक्विड ऑक्सिजन प्लांटची तर गरज आहेच, पण त्यापेक्षा हवेतून ऑक्सिजन तयार करणारा प्लांट तुलनेने लवकर उभारला जातो व लवकर उपयोगात येतो. त्यामुळे मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरसाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे चार प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

Web Title: Meltron will have four oxygen plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.