व्हीप डावलून सेना सदस्यांचे मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:18 AM2017-09-28T00:18:49+5:302017-09-28T00:18:49+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या १७ जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील १० सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान प्रक्रियेत निर्भिडपणे भाग घेतला. विशेष म्हणजे, शिवसेनेने आपल्या १० सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मतदान करु नये, असा आदेश व्हीपद्वारे बजावला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेङ: जिल्हा नियोजन समितीच्या १७ जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील १० सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान प्रक्रियेत निर्भिडपणे भाग घेतला. विशेष म्हणजे, शिवसेनेने आपल्या १० सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मतदान करु नये, असा आदेश व्हीपद्वारे बजावला होता.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ग्रामीण निर्वाचनक्षेत्र अर्थात जिल्हा परिषदेतून २८ सदस्यांची निवडणूक होती. यातील १७ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ११ सदस्यांसाठी २७ सप्टेंबर रोजी मतदान झाले. या मतदानात शिवसेनेच्या १० सदस्यांनी सहभागी होऊ नये असा व्हीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष भुजंग पाटील आणि बाबूराव कदम यांनी बजावला होता. वृत्तपत्राच्या माध्यमातून हा व्हीप काढण्यात आला होता. त्यात प्रवीण पाटील चिखलीकर, बबनराव बारसे, प्रणिताताई देवरे, गजानन गंगासागर, विजयकुमार बास्टेवाड, मारोती लोखंडे, भाग्यश्री साबणे, पद्मा सतपलवार, मोनाली पाटील आणि संगीता गायकवाड या सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या मतदानास गैरहजर राहण्याचे बजावण्यात आले होते. तसेच मतदान केल्यास कार्यवाहीचा इशाराही दिला होता. मात्र या इशाºयाला धुडकावून लावत सर्वच शिवसेना सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुकीत मतदान करु नये ही भूमिका मान्य नसल्याचे या सदस्यांनी सांगितले. आम्ही सर्वांनीच मतदान केले असून आता कार्यवाही कुणावर करणार? असा सवालही उपस्थित केला. एकीकडे तुरुंगात असलेल्यांना मतदानासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते. इथे मात्र चक्क मतदानाच्या अधिकारावरच गदा आणली जात आहे. ही बाब लोकशाही परंपरेला शोभणारी नसल्याचेही सदस्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. १९ सप्टेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. १९ रोजी ३५ पैकी १८ जागा बिनविरोध निवडल्या होत्या. उर्वरित १७ जागांसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. नांदेड शहरातील तीन मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यात ग्रामीण निर्वाचनक्षेत्र अर्थात जिल्हा परिषदेसाठी १०० टक्के मतदान झाले. तर मोठे नागरी निर्वाचन क्षेत्रासाठी ६६.६७ टक्के मतदान झाले आणि लहान नागरी निर्वाचनक्षेत्र अर्थात नगरपालिका क्षेत्रासाठी ९६ टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलासाठी असलेल्या पाच जागांसाठी शोभाताई गोमारे, संगीता जाधव, अंकिता देशमुख, मोनाली पाटील, प्रणिता बंदखडके, संगीता मॅकलवाड आणि ललिता येलमगोंडे हे उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण गटातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सूर्यकांत आरंडकर, प्रकाशराव कल्याणकर, प्रवीण चिखलीकर, समाधान जाधव, व्यंकटराव पाटील, मधुकर राठोड आणि मनोहर शिंदे या सात उमेदवारांचा समावेश आहे. नगर पालिका क्षेत्रातील अनु. जाती महिलांसाठी असलेल्या एका जागेसाठी अनिता कदम आणि वैशाली चौदंते यांच्यात लढत होत आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील एका जागेसाठी चंद्रकांत गरुडकर आणि म. सरवर यांच्यात लढत झाली. सर्वसाधारण गटातून विठ्ठल कुडमुलवार आणि बाबूराव डोंब तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महानंदा पाटील, दीपाली मामीलवाड यांच्यात थेट लढत झाली. महापालिकेच्या दोन जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. त्यात नागरिकांच्या मागासप्रवर्गातून अ.लतिफ, सुंदरलाल गुरखुदे यांच्यात तर सर्वसाधारण गटातून अशोक उमरेकर, उमेश चव्हाण यांच्यात सरळ लढत होत आहे.
या निवडणुकीची मतमोजणी २८ सप्टेंंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचे निकाल दुपारपर्यंत येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.