अतिक्रमणाच्या गुन्ह्याची माहिती लपवणाऱ्या दांपत्याचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 07:35 PM2019-08-07T19:35:03+5:302019-08-07T19:40:26+5:30
अतिक्रमण खटल्याची सुनावणी प्रलंबित आहे
कन्नड (औरंगाबाद ) : शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केल्याने तालुक्यातील जामडी घाट ग्रामपंचायतचे उपसरपंच व त्यांच्या पत्नीचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले.
उपसरंपच राजू मन्साराम पवार व त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्या यशोदाबाई पवार असे सदस्यांची नावे आहेत. पवार पती-पत्नी यांनी जामडी येथील सर्वे क्र. २७ गट नं. २५ मधील वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याने वन खात्याने दि. २३ जुन २०१० रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ ( १ ) ( ई ) ( फ) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. याची सुनावणी खटला क्र. २०१ / २०१० अन्वये प्रलंबित आहे. मात्र, पवार पती-पत्नीने प्रतिज्ञापत्रामध्ये याविषयी खोटी माहिती नमुद केली असल्याची तक्रार राजू रामचंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देत पवार पती-पत्नींचे सदस्यत्व रद्द केले.