एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 08:21 PM2024-08-12T20:21:15+5:302024-08-12T20:21:45+5:30
प्रवासाच्या प्रारंभी जागेवरून उठविता येते; मधल्या थांब्यावर मात्र राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही
छत्रपती संभाजीनगर : एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत असल्याने त्यांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर पुरुष बसतात. राखीव आसनावर सुरुवातीच्या थांब्यावर इतर प्रवासी बसलेला असेल तर सवलतधारक प्रवाशासाठी त्या प्रवाशाला जागेवरून उठविता येते. परंतु, प्रवासाच्या मधल्या थांब्यावर राखीव जागांवरून सवलतधारकासाठी कोणालाही उठविता येत नाही.
सवलतधारकांसाठी साधी, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये वेगवेगळी आसने निश्चित केलेली आहे. या राखीव जागांवर सुरुवातीच्या थांब्यावर इतर कोणी बसलेले असेल तर त्यास उठविता येते. परंतु मधल्या थांब्यावर राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही. दिव्यांग प्रवाशाला मात्र प्रत्येक थांब्यावर जागा उपलब्ध करून दिली जाते.
एसटी बसध्ये कोणासाठी किती जागा राखीव
महिला : लाल बस म्हणजे, साध्या बसमध्ये महिलांसाठी १९ ते २२ आणि २९, ३० क्रमांकाचे आसन राखीव आहे.
दिव्यांग : साध्या बसमध्ये ३ ते ६ क्रमांकाचे आसन राखीव आहे.
ज्येष्ठ नागरिक : लाल बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी साध्या बसमध्ये ११ आणि १२ क्रमांकाचे आसन राखीव आहे.
स्वातंत्र्य सैनिक : साध्या बसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांसाठी १३,१४ क्रमांकाचे आसन आहे.
एसटी कर्मचारी : लाल बसमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी ३१ आणि ३२ क्रमांकाचे आसन राखीव आहे.
अधिस्वीकृतीधारक पत्रकार : २७ आणि २८ क्रमांकाचे आसन लाल बसमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी राखीव असते.
बसमध्ये महिलांची गर्दी वाढली
एसटीत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाते. ही सवलत सुरू झाल्यापासून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. गेल्या दीड वर्षात म्हणजे एप्रिल २०२३ ते जून २०२४ या कालावधीत तब्बल १ कोटी ८२ लाख महिलांनी ‘लाल परी’ने प्रवास केला.
राखीव जागांवर अन्य कोणी बसला तर
बसमध्ये ज्यांच्यासाठी आसन राखीव आहे, तो बसमध्ये नसेल तर इतर प्रवासी त्यावर बसू शकतात. मात्र, संबंधित लाभधारक जर बसमध्ये आल्यास इतर प्रवाशाला आसन त्या प्रवाशाला द्यावे लागते. वाहकाला सूचित केल्यास राखीव जागेवरील प्रवाशाला उठवता येते.
‘लोकमत’ने काय पाहिले?
वाशिम - नाशिक : मध्यवर्ती बसस्थानकात ही बस उभी होती. यावेळी महिलांच्या जागेवर पुरुष बसलेले होते. याच वेळी काही महिला बसमध्ये चढल्या. परंतु जागा नसल्याचे पाहून त्या पुन्हा खाली उतरल्या.
छत्रपती संभाजीनगर - पुणे-राजगुरुनगर : बसमध्ये महिलांसाठी राखीव जागेवर तरुण बसलेला होता. परंतु त्याला जागेवरून उठण्याचा आग्रह धरण्याऐवजी महिला प्रवासी जागा शोधत होती.