उपकुल सचिवांकडून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:04 AM2021-05-22T04:04:07+5:302021-05-22T04:04:07+5:30
औरंगाबाद : विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्तवेळ बसवून ठेवणे, गरज नसताना सुटीच्या दिवशी कामावर बोलावून मानसिक छळ केल्याच्या ...
औरंगाबाद : विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्तवेळ बसवून ठेवणे, गरज नसताना सुटीच्या दिवशी कामावर बोलावून मानसिक छळ केल्याच्या उपकुल सचिवांविरुद्धच्या लेखी तक्रारी दोन महिला कर्मचाऱ्यांनी कुलगुरुंकडे केल्या. दरम्यान, या प्रकरणातील एक महिला कर्मचारी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कुलगुरुंनी कुलसचिवांना दिले आहेत.
यासंदर्भात कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले की, अलिकडे विद्यापीठात कायम सेवेत असलेल्या एका डाटाएण्ट्री ऑपरेटर महिलेची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे प्राप्त झाली असून, त्यात उपकुलसचिव इश्वर मंझा यांनी आपला मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याचीदेखील कुलगुरु डॉ. येवले यांच्याकडे अशाच प्रकारची तक्रार प्राप्त झाली. तथापि, विद्यापीठ प्रशासनाला तक्रारदार दुसरी महिला कर्मचारी ही विद्यापीठाच्या कोणत्याही अस्थापनेवर अथवा बाह्यस्रोत कर्मचारीदेखील नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तूर्तास डाटाएण्ट्री ऑपरेटर महिलेच्या तक्रारीवरून विद्यापीठ प्रशासनाने उपकुलसचिव मंझा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा मागितला आहे.
दरम्यान, दिवसभरातील या घडामोडींमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली असून, ती महिला कोण असेल, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. दोनपैकी एक महिला विद्यापीठात कर्मचारी नसताना थेट कुलगुरुंकडे तक्रार दाखल करण्याचे धाडस करते कशी, या तर्कवितर्कांना उधाण आले होते.