संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:02 AM2021-09-08T04:02:01+5:302021-09-08T04:02:01+5:30
सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा - प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून ...
सुसंवाद महत्त्वाचा : एकलकोंडेपणा, नैराश्य टाळा, सुसंवाद साधा
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : कोरोना काळापासून अनेक लोक एकमेकांपासून दुरावले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यात गर्दीविषयी भीती निर्माण झाली आहे. यामुळे घरात बसून त्यांच्यात एकलकोंडेपणा, नैराश्य आले आहे. संवाद तुटल्याने मन हलके करता येत नसल्याने ताणतणाव वाढला आहे.
संवाद नसल्याने मनावरील ताण एवढा वाढतो की, नैराश्यातून आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी नैराश्य हे एक मोठे कारण ठरत आहे.
ताणतणाव कमी करण्यासाठी सुसंवाद साधने आवश्यक आहे. लहान मुलांनी मित्रांमध्ये खेळणे, मोठ्यांनी आपल्या समस्या जवळच्या मित्रांना सांगून आपले मन हलके करावे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.
---
मन हलके करणे हाच उपाय
१) एकलकोंडे न होता नातेवाईक, मित्र परिवाराच्या संपर्कात राहणे.
२) मोबाइल, सोशल मीडियात जास्त न रमता जवळच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधणे.
3) एकमेकांना त्यांच्या उणिवासह स्वीकारणे.
४) स्वतःच्या भावना जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त करणे.
५) लहान मुलांनी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा.
----
नैराश्य टाळा
एकांतवासाने नैराश्य निर्माण होते. यामुळे कोणी एकलकोंडेसारखे वागत असेल, तर अशा व्यक्तींकडे लगेच लक्ष द्या. त्यांच्याशी सतत बोलून, धीर देऊन मन हलके करायला लावा. अनेकदा नैराश्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
डॉ. रश्मीन अचलिया
---
प्रत्यक्ष भावना व्यक्त करा
सध्या लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करतात; मात्र त्याऐवजी त्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर प्रत्यक्ष व्यक्त करा. त्यामुळे भावनिक आधार मिळू शकतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते ऑनलाइनमुळे भावनिक राहिले नाही. संवाद नसल्याने विसंवाद तसेच गैरसमज निर्माण होण्याची जास्त भीती असते.
डॉ. आनंद काळे