‘म्याव म्याव,चीज, दवा' ड्रग्जसाठी अनेक कोडनेम; तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात
By संतोष हिरेमठ | Published: October 24, 2023 12:36 PM2023-10-24T12:36:09+5:302023-10-24T12:38:26+5:30
मानसिक आरोग्यावर परिणाम : ड्रग्जच्या व्यसनाने गाठावे लागते रुग्णालय
छत्रपती संभाजीनगर : ‘म्याव म्याव’, चीज, दवा है क्या...अशी विचारणा तरुणाईमध्ये बिनधास्तपणे होते. तुम्ही म्हणाल ही कशाची नावे आहेत? ही काही खाद्यपदार्थांची नावे नाहीत, तर ही काही ड्रग्जची सांकेतिक नावे आहेत आणि नशेखोरांमध्ये अगदी सहजपणे बोलली जातात. पुणे, मुंबई, नाशिकपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरही ड्रग्जच्या उद्योगाने हादरून गेले आहे. शहरात रविवारी घडलेल्या कारवाईने ड्रग्ज उद्योग शहरात किती खोलवर पोहोचला आहे, याची कल्पना येते.
कोरोना प्रादुर्भावानंतर तरुणाईमध्ये ड्रग्जचे व्यसन वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. व्यसन दारूचे असो, तंबाखूचे, सिगारेटचे असो की ड्रग्जचे, कधी ना कधी व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
कोणकोणत्या पदार्थांची नशा?
छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखाेरी दिवसेंदिवस वाढत आहे. मद्यपान, गांजापाठोपाठ नशेसाठी चिकटवण्यासाठी वापरला जाणारा एक द्रव, झोपेच्या गोळ्यांचे सेवन तर वाढतच आहे; परंतु शहरातील तरुणाई कोकेन, एमडी, ब्राऊन शुगर, चरसच्या विळख्यात सापडत आहे. नशेसाठी सहज उपलब्ध असलेल्या व्हाइटनर, बूट पॉलिशसाठी वापरले जाणारे पॉलिश, पेनबाम, नेलपेंट, झोपेच्या गोळ्या, अगदी पेट्रोलचाही नशेसाठी वापर केला जातो. परंतु, त्याबरोबर ब्राऊन शुगर, चरस, कोकेन, एमडी अशा अमली पदार्थांची नशा करणारेही आढळून येतात. थेट ड्रग्जचे नाव घेण्याऐवजी वेगवेगळ्या नावांनी उल्लेख केला जातो. ही सांकेतिक नावेही सतत बदलली जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आठवडाभरात २ ते ३ जण
काही लोक तणावापासून दूर जाण्यासाठी किंवा स्वतःची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा आपल्या मित्रपरिवाराच्या दबावाखाली येऊन किंवा व्यवसायाची गरज म्हणून किंवा कधी आनंद साजरा करण्यासाठी व्यसनाची सुरुवात करतात. आठवडाभरात २ ते ३ रुग्ण येतात.
- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
काही तरी नवीन किंवा धोकादायक करण्याची इच्छा ही किशोरवयीन विकासाचा एक सामान्य भाग आहे. अशा वेळी व्यसनाकडे वळण्याची अधिक शक्यता असते. मुलांकडे, त्यांच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ
दूरगामी परिणाम
व्यसनाचे मानसिक आणि शारीरिक असे दूरगामी परिणाम होतात. काही नशेचे पदार्थ स्वस्त, तर काही महाग असतात. व्यसनामुळे त्रास वाढल्यानंतर काही जण स्वत:च, तर काही जणांना नातेवाईक घेऊन येतात.
- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ
काय म्हणते तरुणाई?
व्यसनापासून दूर राहिलेले बरे
व्यसन कोणतेही असो, त्यापासून तरुणांनी दूरच राहिलेले बरे. कोणत्याही व्यसनाला बळी पडता कामा नये.
- ओंकार सोनटक्के
कुटुंबीयांचा विचार करावा
व्यसन करण्यापूर्वी तरुणांनी कुटुंबीयांचा विचार केला पाहिजे. कुटुंबीय मोठी मेहनत करून मुलांना वाढवितात, शिकवितात.
- अभिजित पवार