शहरात मेफेड्रोनची छुप्या पद्धतीने विक्री; तस्कराला पोलिसांनी भल्या पहाटे घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 07:06 PM2021-07-02T19:06:03+5:302021-07-02T19:06:37+5:30
रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कर्णपुरा मैदान येथे एक जण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली.
औरंगाबाद : मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कर्णपुरा मैदानावर गुरूवारी भल्या पहाटे ३ वाजता सापळा रचून पकडले. यावेळी आरोपीकडून २६ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन पावडर, ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ४५० रुपयांची रोकड जप्त केली. जुनैद खान जावेद खान(२५,रा.बारी कॉलनी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काही दिवसांपासून शहरात मेफेड्रोन या अंमली पदार्थाची नशा केली जात आहे. यामुळे काही जण चोरट्या मार्गाने सर्रास नशेखोरांना मेफेड्रोन पुरवित असतात. पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने गेल्या काही महिन्यांत मेफेड्रोन तस्करांवर कारवाई केली. या कारवाईनंतरही शहरात मेफेड्रोनची विक्री छुप्या मार्गाने सुरूच असल्याचे समोर आले. रेल्वेस्टेशन रस्त्यावरील कर्णपुरा मैदान येथे एक जण मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली.
यानंतर सहायक निरीक्षक रोडे, कर्मचारी सय्यद शकील, इमरान पठाण, ए. आर. खरात, एम.बी.विखनकर, विजय निकम, विठ्ठल आडे, चालक व्ही.एस.पवार, छायाचित्रकार चौधरी, फॉरेन्सिक विभागाचे निरीक्षक वैभव घाडगे, माधुरी खरात यांच्या पथकाने २ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कर्णपुरा मैदानावर सापळा रचला. संशयित तरुण तेथे येताच पोलिसांनी त्याला पकडले. तेव्हा पंचासमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी प्लास्टिकच्या लहान पिशव्यांमध्ये २६ हजार रुपये किमतीचे ६.७३ ग्रॅम मेफेड्रोन, मोबाईल आणि रोख ४५० रुपये रोख असा एकूण १ लाख १६ हजार ४५० रुपयांचा ऐवज आढळला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.