मिरची व्यापाऱ्याने एनआरआयला घातला ४७ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:19 PM2019-01-21T23:19:02+5:302019-01-21T23:19:31+5:30
मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद : मिरचीच्या व्यवसायात ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, यामुळे या व्यवसायात तुम्ही पैसे गुंतविल्यास एक लाखामागे दरमहा तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून अनिवासी भारतीयाला (एनआरआय) मिरची व्यापाºयाने तब्बल ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून सोमवारी रात्री सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.
मोहम्मद रफियोद्दीन मोहम्मद जैनू सालेहीन (रा. बारी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, हिमायतबाग एन-१३, येथील रहिवासी मोहंमद खलीलउल्ला सिद्दीकी गुलाम हे अनिवासी भारतीय आहेत. ते नोकरीनिमित्त ओमान देशात राहतात. त्यांचे किलेअर्क येथेही घर आहे. ते तीन ते चार महिन्यांतून एकदा औरंगाबादेत येतात आणि काही दिवसांनंतर परत ओमानला जातात. २०१५ मध्ये त्यांची एका मित्राकडून आरोपी रफियोद्दीनसोबत भेट झाली. त्यावेळी त्याने तो गावाबाहेरील मार्केटमधून मिरची खरेदी करून उदयपूर, अहमदनगर, सांगली येथे विक्रीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या व्यवसायात वार्षिक ३० ते ३५ टक्के नफा मिळतो, असे त्याने सांगितले. तुम्ही पैसे गुंतविल्यास लाखाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिमहिना रक्कम मिळेल, असे तो म्हणाला. खलीलउल्ला यांनी जानेवारी २०१५ मध्ये त्याला ३ लाख २५ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर दोन महिन्याचा मोबदला म्हणून ६ हजार रुपये आरोपीने त्यांना दिले. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी ४ लाख ३० हजार रुपये, १५ मार्च २०१६ रोजी दोन लाख रुपये रोखीने तर ६ मे २०१६ रोजी धनादेशद्वारे ३४ लाख ५५ हजार रुपये दिले. शारजा येथे असताना त्यांनी डिमांड ड्राफ्टद्वारे रफियोद्दीनच्या बँक खात्यात ३ लाख ६२ हजार ६४७ रुपये असे एकूण ४७ लाख ७२ हजार ६४७ रुपये दिले. त्याला तीन वेळा पैसे मिळाल्याचे रफियोद्दीनने डायरीवर लिहून दिल्याचे खलीलउल्ला यांनी तक्रारीत नमूद केले. गुंतविलेल्या रकमेवर आरोपीने खलीलउल्ला यांना नोव्हेंबर २०१७ पर्यंत काही प्रमाणात परतावा दिला. त्यानंतर मात्र मार्केट डाऊन आहे. व्यापाºयांकडून पैसे आले नाही, जीएसटीचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशी विविध कारणे सांगून पैसे देणे बंद केले. गुंतवणूक केलेली रक्कम खलीलउल्ला यांनी परत मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच खलीलउल्ला यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली.
मिरची व्यापाºयाचा आणखी एकाला १९ लाखांचा गंडा
खलीलउल्ला यांच्याप्रमाणेच त्यांचे मित्र कलीमउल्लाह खान इब्राहिम खान (रा.रोहिल्ला गल्ली) यांचीही आरोपी रफियोद्दीनने १९ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, पोहेकॉ. अरुण वाघ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.