'वॉव मोमोज' फ्रँचाईजीच्या आमिषाने व्यापाऱ्याची १२ लाख रुपयांना फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 07:31 PM2022-03-10T19:31:02+5:302022-03-10T19:36:29+5:30
सोशल मीडियात सर्फिंग करत असताना त्यांना वॉव मोमोज या खाद्यपदार्थाच्या ब्रॅंडविषयी माहिती मिळाली.
औरंगाबाद : वॉव मोमोज या प्रसिद्ध खाद्य ब्रँडची फ्रँचाईजी देण्याचे आमिष दाखवून तीन भामट्यांनी शहरातील एका व्यापाऱ्याला तब्बल ११ लाख ९६ हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आयटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
कैलाश लक्ष्मणदास तलरेजा (रा. सिंधी कॉलनी) हे मोंढा नाका येथे वडापाव, समोशांचा व्यवसाय करतात. ३ डिसेंबर २०२१ रोजी सोशल मीडियात सर्फिंग करत असताना त्यांना वॉव मोमोज या खाद्यपदार्थाच्या ब्रॅंडविषयी माहिती मिळाली. त्यांनी अधिक माहितीसाठी गुगलवर सर्च केले. त्यावेळी त्यांना एक संकेतस्थळ दिसले. त्यावर त्यांनी नाव, मेलसह संपर्क क्रमांक असलेला एक फाॅर्म भरला. त्यानंतर सहा दिवसांनी त्या मेलला उत्तर प्राप्त झाले. त्यावर सविस्तर माहिती, बँक डिटेल्स, आधारकार्ड, पॅनकार्डसह इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर कंपनीकडून त्यांना एक माहितीपत्रक प्राप्त झाले. त्यात ब्रँडची व्यापारविषयक माहिती, फ्रँचाईजी घेण्याविषयीचे नियम देण्यात आले होते.
तसेच एका भामट्याने कॉल करून माहिती दिली. त्यासाठी ८ लाख रुपये शुल्क मागितले. तलरेजा यांना सर्व बिझनेस प्लान आवडल्यामुळे त्यांनी नोंदणी अर्ज भरून सांगितल्याप्रमाणे पैसे बँकेत भरले. असे एकूण त्यांनी ११.९६ लाख रुपये भरले. यानंतर तलरेजा यांना सांगण्यात आले की, लवकरच फ्रँचाईजी सुरु होईल. दि. ८ जानेवारीपर्यंत कोणतीही सूचना मिळाली नव्हती. त्यादिवशी वाहनाचा अपघात झाला असून, प्रकरण मिटविण्यासाठी २ लाख २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली, तेव्हा तलरेजांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली. त्यानंतर आलेल्या ई-मेलविषयी खात्री केल्यानंतर सर्व प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सायबर ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी तपासानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करत आहेत.
तीन भामट्यांचा प्रताप
संजीव कुमार, श्रीवास्तव आणि संदीप कश्यप या तीन भामट्यांनी व्यापाऱ्याला फसविले असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरिकांनी पूर्णपणे खात्री केल्याशिवाय ऑनलाईन व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबरचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.