पारा ३६ वर ! फेब्रुवारीमध्येच बीडकरांच्या जिवाची लाही-लाही
By Admin | Published: February 23, 2016 12:32 AM2016-02-23T00:32:48+5:302016-02-23T00:32:48+5:30
बीड : फेब्रुवारी महिना संपत आलेला असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. सोमवारी जिल्ह्यात ३६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली.
बीड : फेब्रुवारी महिना संपत आलेला असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. सोमवारी जिल्ह्यात ३६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली.
पावसाळ्याचे चार महिने कोरडेठाक गेले. हिवाळ्याच्या मोसमातही फारशी थंडी जाणवली नाही. आता हिवाळा संपत नाही तोच उन्हाने डोके वर काढले आहे. त्यामुळे हिवताप, सर्दी-खोकला यासारखे आजार बळावत आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली. दुपारी सूर्य चांगलाच तळपत होता. अनेकांनी दुपारच्या वेळी घरात पंखे, कूलर आदींचा आश्रय घेणे पसंत केले, त्यामुळे रस्ते सूनसान झाले होते. शासकीय कार्यालयांमध्येही पंखे, कूलरची दुरुस्तीचे काम चालू होते. सोमवारी नोंदविलेले तापमान या महिन्यातील सर्वाधिक होते. गत आठवड्यापर्यंत किमान तापमान २०, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविले गेले. पारा वेगाने वर जाऊन किमान २३, तर कमाल ३६ अंश सेल्सियसवर स्थिरावला.
दरम्यान, बसस्थानकासह बाजारपेठांमध्ये थंडपेयांना वाढती मागणी होती. उन्हात फिरताना नागरिकांनी डोक्यावर गमछे, टोप्या आदींचा आधार घेतला.
येत्या काही दिवसांमध्ये पारा चाळीशी पार करण्याची शक्यता आहे. थंड पेय, पंखे, कूलर दुरूस्तीचे व्यवसाय जोमात आहेत. (प्रतिनिधी)