पारा ४३ अंशांवर..
By Admin | Published: May 6, 2017 12:25 AM2017-05-06T00:25:23+5:302017-05-06T00:26:34+5:30
जालना : शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम आहे. शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली.
जिल्ह्यात गत काही वर्षांपासून तापमानात कमालीची वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन अंशांनी तापमान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शुक्रवारी जिल्ह्याचे सरासरी तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. वाढत्यामुळे उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अवकाळीमुळे उन्हाची तीव्रता कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र उन्हाचा पारा वाढला आहे. उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने आबालवृद्धांचे हाल होत आहेत. तापमान ४३ अंश असले तरी याची तीव्रता ४६ अंशां सारखी भासत होती. दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस अंशांवर असलेले तापमान दुपारी तीन वाजता ४३ अंशांवर गेले. विविध संकेतस्थळांवर तापमान ४३ अंश दाखवित होते. अंबड, परतूर, मंठा ४२ तर भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत पार ४१ ते ४२ अंशांवर स्थिरावत होता. जिल्ह्याचे तापमान मात्र ४३ अंश दिसत होते. शुक्रवारी कडक उन्हामुळे शहरात दिवसभर सन्नाटा दिसून आला. लग्नतिथी असूनही दुपारनंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली होती. उन्हाच्या तीव्रतेने जलसाठ्यांत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येते. कडक उन्हामुळे आठवडी बाजारातील गर्दी रोडावलेलीच आहे. उन्हामुळे लग्नसमारंभातील गर्दीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी याच दिवशी तापन ३९ ते ४० अंश होते. यंदा त्यात वाढ होऊन ते ४३ अंशांवर गेले आहे. शेतीमध्ये पीक नसले तरी फळबागा व भाजीपाल्यास वाढत्या तापमानाचा मोठा बसत आहे. अत्यल्प पाणी व उन्हाची तीव्रता यामुळे फळबागा वाळून जात असल्याचे शेतकरी सांगतात.